
पालीच्या विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत घवघवीत कामगिरी!
पालीच्या विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत घवघवीत कामगिरी!
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील जि.प. आदर्श विद्यामंदिर, पाली क्र. १ शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा गौरव वाढवला आहे.
दिक्षा महेंद्र मेस्त्री हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ५वे, तर तालुक्यात प्रथम स्थान मिळवले आहे. हर्ष महेश धाडवे याने जिल्ह्यात २६वे, तालुक्यात चौथे, तर सत्वशील सहदेव गुरव याने जिल्ह्यात ११२वे, तालुक्यात ११वे स्थान पटकावले आहे.
ही शाळा जि.प.च्या मराठी माध्यमातील एकमेव शाळा असून, याआधी अशा प्रकारे एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झालेली नव्हती. विशेष म्हणजे, या तिघांची जवाहर नवोदय विद्यालयातही यापूर्वी निवड झाली आहे.
या यशामागे शाळेचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, तसेच शिक्षक ममता सावंत व श्रद्धा रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, कोकण विभागीय परीक्षा मंडळाच्या सहसचिव प्रेरणा शिंदे, व तालुका गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.