
विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना”
“विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना”
अमळनेर प्रतिनिधी – मांडळ ते वावडे दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या अधिपत्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून रोज शेकडो नागरिक ये-जा करतात. परंतु खड्डे चुकवताना वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो आहे.
गाडी चालवताना पाठीला धक्के बसतात, दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडते, तर चारचाकी वाहनांचे नुकसान होते. काही ठिकाणी रस्त्याचे अस्तित्वच उरलेले नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याची दैना झाली असून, पुढचे दिवस आणखी कठीण ठरण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचं म्हणणं आहे की, “सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे कानाडोळा करत आहेत. केवळ टेंडर, कामांचे उद्घाटन आणि पत्रव्यवहार यापलिकडे काहीच होत नाही.”
स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती न झाल्याने संताप वाढला आहे. लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का? की एखादा मोठा अपघात झाल्यावरच हलतील यंत्रणा?
रस्त्याची अवस्था पाहता, उत्तरदायित्वाची गरज आता टळलेली नाही…