
“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न”
“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
तालुक्यातील महाराणा प्रताप नगर (वंजारी खु.) येथे एक सामाजिक भान जागवणारा आणि पर्यावरण पूरक उपक्रम उत्साहात पार पडला. स्व. स्वामी प्रसादसिंग माधवराव पवार युवा फाउंडेशन व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रमेश निंबा चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पीआय सचिन सानप, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन, सुदाम बेडीस्कर, भूषण पाटील (नर्सरी प्लांट, भोकरबारी), तसेच योगेश, प्रविण, सुभाष, समाधान, प्रदीप, मिलिंद, रोशन राजपूत उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत डॉ. योगेश महाजन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विशेष विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत मन जिंकले. कुणाल पाटील याने सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली, तर प्रधान बारेला याच्या भक्तिगीताने कार्यक्रमात आध्यात्मिक छटा निर्माण केली. कु. श्रुती महाजन हिने पारंपरिक पद्धतीने औक्षण करत पाहुण्यांचे स्वागत केले.
पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत डॉ. योगेश महाजन व शिक्षकवर्गाच्या सेवेचा गौरव केला. “परिश्रम संस्थेच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण घडतं आहे,” अशा शब्दांत सचिन सानप पीआय, बाळासाहेब पाटील आणि रमेश चौधरी यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश सोनवणे, तर आभारप्रदर्शन हेमंत महाजन यांनी केले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक हा कार्यक्रम यशस्वी केला.
शाश्वत भविष्यासाठी प्रत्येक वृक्ष नवचैतन्याचे प्रतीक ठरत असून, ही हरित चळवळ समाजाला नवा संदेश देत आहे.