
रिपोर्ट अथवा चॅनलच्या टीआरपी साठी आपला जीव धोक्यात घालू नका मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रसृष्टीला कळकळीचे आवाहन
रिपोर्ट अथवा चॅनलच्या टीआरपी साठी आपला जीव धोक्यात घालू नका
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रसृष्टीला कळकळीचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी
प्रश्न आहे, चॅनलच्या टीआरपीसाठी, किंवा संपादकांच्या “छान रिपोर्ट केलास” अशा शब्दांसाठी रिपोर्टर्सनी आपला जीव धोक्यात घालायचा का हा? चँनल्स किंवा मालिकांसाठी आपल्यासारखे हजार रिपोर्टर्स मिळतात, कुटुंबाचं काय? अगोदरच तुटपुंज्या पगारात सर्व पत्रकार घर चालवतात, त्यातही नको असलेलं धाडस करून आपण आपला जीव गमावतो आणि कुटुंबाला रस्त्यावर आणतो..मला माहिती आहे, कोरोनाचं रिपोर्टींग करताना देशात अनेक पत्रकारांना केरोनाची बाधा झाली आणि त्यांचा जीव गेला.. कुठल्याही दैनिकाचा, चँनलचा मालक, समाज, सरकार अशा पत्रकारांच्या मदतीला आला नाही.. कुटुंबाची वाताहत झाली.. मान्य आहे, जनतेला माहिती देणं आपलं काम आहे, कर्तव्य देखील आहे, परंतू त्या बदल्यात आपला जीव धोक्यात घालणं मला अजिबात मान्य नाही.. तेव्हा ‘ब्रेकिंग न्युज, ‘एक्सक्लुझीव्ह’ किंवा ‘ऑन दि स्पॉट रिपोर्ट’ च्या नादी न लागता काळजी घेऊनच रिपोर्टींग केलं पाहिजे..कारण आपण जिथे काम करतो त्या माध्यम समुहाला आपली अजिबात काळजी नसते, त्यांनी आपला विमाही काढलेला नसतो.. नैसर्गिक आपत्तीचं रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकारांचा माध्यम समुहांनी विमा उतरविला पाहिजे ही मागणी आम्ही सातत्यानं करीत आलो आहोत.. मोठ्या माध्यम समुहांना आम्ही तशी पत्रं देखील यापुर्वीच लिहिलेली आहेत.. मात्र मालकांना पत्रकारांची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही.. सोबत दिलेला व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे.. लाईव्ह रिपोर्टींग करण्याच्या नादात काल एक पत्रकार हातात माईक घेऊन भरून वाहणाऱ्या नदीत उतरतो , तेथून रिपोर्टींग करू लागतो .. पाण्याचा वेग वाढतो .. आणि मग तो बघता बघता अन बोलता बोलता वाहून जातो. काय म्हणायचं याला? धाडस की वेडेपणा? काहीही म्हणा.. एका पत्रकाराचा मात्र जीव गेला.. या घटनेनंतर पाकिस्तानी माध्यमात पत्रकारांच्या सुरक्षेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे… आपल्याकडं ही पाऊस, पूर सुरू आहे.. सर्व पत्रकारांनी काळजी घेतली पाहिजे…. (एस.एम. देशमुख, मो. 94233 77700)