
डॉ. बाबासाहेबांचा बुद्धमय भारत म्हणजे बुद्धीनिष्ठ, विज्ञानवादी, विवेकवादी भारत होय…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलत :मानवतावादी विचाराचे पुरस्कर्ते होते.. डॉक्टर बाबासाहेबांचे मुळगाव अंबावडे होते.. तिथे त्यांचे पूर्वज रहात होते.. त्यांचे कुळ सकपाळ होते.. गावाच्या नावात लिहतांना बदल होऊन अंबावडेकर ऐवजी आंबेडकर झाले..डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म महू ह्या मध्यप्रदेशातील गावात झाला.. वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश छावणीत सुबेदार होते.. वडील कबीरपंथी असल्याने त्यांच्यासोबत सत्संग, जलसा, पुरोगामी व्याख्याने याला आंबेडकर जात असत.. त्या सत्संगामुळे भीमावर पुरोगामी विचाराचा परिणाम झाला.. श्री रामजी आंबेडकरांना छावणीत चांगला मान होता.. त्यांना ब्रिटिशांनी शिक्षकी ज्ञान घेण्यासाठी पाठवले त्या प्रशिक्षणाचे तज्ज्ञ प्रशिक्षक महात्मा फुले होते.. महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव श्री रामजी आंबेडकरांवर झाला त्यांना शिक्षणातून नवी पुरोगामी दिशा मिळाली…
माणसाला माणुसकीने वागविणे हाच नीतिमत्तेचा पाया आहे.महात्मा फुलेंच्या विचारात समता, न्याय, स्वातंत्र्य, शील, करुणा, बंधुता असल्याने तसेच बुद्धाचा विचार हाच असल्याने त्या विचाराचे,तत्वाचे
अनुसरण झाले…राजे शिवाजी बद्दल महात्मा फुलेंना खरा इतिहास इंग्रज इतिहासकरांनी लिहलेल्या पुस्तकावरून कळाला.. त्याने ते प्रभावित झाले..त्या विचारमुळे त्यांनी राजे छत्रपती शिवाजी यांची समाधी शोधून शिवजयंती साजरी केली..
अशा अनेक पुरोगामी विचाराने बालपण सशक्त झालेला भीमराव मानवतेवर अन्याय करणाऱ्या जुलूमी व्यवस्थेवर लेखणीच्या व वाकचातुर्य हया कौशल्याने प्रहार करीत राहिला.. खोटे दाखले, खोट्या कल्पना यांचे डॉ. बाबासाहेबांनी तर्कशुद्धतेने वास्तव जगासमोर मांडले..
डॉ. बाबासाहेबांना तर्कनिष्ठ, विवेकशील, परिवर्तनीय, नैतिक, समानता व संधी देणारा विचार रुजवायचा होता.. त्यासाठी सर्वांना समतेच्या मार्गाने नेणारा मानवतेची भाषा करणाऱ्या धम्माकडे ते आकर्षित झाले.. ती विचारसरणी कुण्या देवाने सांगितली नव्हती.. त्यात कुणी मोठा छोटा नव्हता.. त्यात भेदभावरहित मार्गक्रमण होते.. आपल्या मागे येणारा समूह भरकटला जाऊ नये.. त्याला चिकित्सक विचार करण्याची सवय असावी.. आपण स्वीकारलेली विचारसरणी त्यांना कर्मकांडापासून अलिप्त ठेवील असा विचार करून त्यांनी धम्म स्वीकारला.. इतर धर्मात धर्मात माणसानेच लिहलेले ग्रंथ देवाने सांगितले, लिहले असे सांगण्यात येते.. धम्म मात्र प्रत्यक्ष पृथ्वीतलावरील माणसाने तयार केलेली अनुभवनिष्ट विचारप्रणाली होती.. त्यात शस्त्राला अहिंसेने पराजित करण्याची ताकद होती..
जे कराल ते चिकित्सा करून करा.. वैज्ञानिक भाव व सत्य पडताळून पाहण्याची दृष्टी असेल बदल करावसा वाटला तर बदल करता येईल… डॉक्टर बाबासाहेबांना धर्म स्वीकारायचा असता तर ते कधीच स्वीकारला असता.. धर्माचे विचार प्रवाही हवे.. त्यात मनावी मूल्य रुजविण्याची आचारसंहिता असावी.. धम्म जर तर्कनिष्ठ नसता तर त्यांनी तो स्वीकारला नसता.. मानवाला स्वातंत्र्य प्रदान करून जे अप्रतिम आहे ते गाठण्याची पायवाट धम्मात दिसत होती म्हणून त्यांनी त्याला स्वीकारले.. जुनेच विचार घेऊन मांडणी करणारे अनेक धर्म होते.. जग बदलले परंतु ते बदलायला तयार नाही.. ग्रह, तारे यांची दिशा ते जमिनीवर राहून बदलविण्याची भाषा करतात असे धर्म नवीन पिढीला काय दिशा देणार? काही धर्माने त्यांची जुने भाकीते विज्ञानाने शोध लावल्यावर सोडले नाही.. अशी अवस्था धर्माची असतांना बाबासाहेबांनी सत्य स्वीकारणाऱ्या धम्माची कास धरली..
आज डॉ. भीमराव आंबेडकरांचा महापरीनिर्वाण दिन आहे.. निर्वाण हा शब्द संस्कृतात सापडतो.. त्यात निर शब्द म्हणजे – दूर करणे. वाण म्हणजे वासना होय. निर्वाण म्हणजे विकार, मोह, मद,मत्सर,वासना यापासून दूर राहणे.. डॉ. बाबासाहेबांनी ही निर्वाण अवस्था कधीच पार केलेली होती.. मुलांचे व रमाई च्या निधनानंतर ते कार्याशी प्रतारणा करू शकले नाही…हिच संकल्पना बुध्द धम्मात पाली भाषेत निब्बान म्हणून आहे.. निर्वीकार होऊन समाजासाठी, सत्कर्मासाठी झीजणे होय.. निर्वाण हे मानसिक पातळीवरील बदल होणे अपेक्षित आहे.. परिनिर्वाण हे निर्वाणच्या सोबत शारीरिक हालचाल नष्ट होणे होय.. महापरिनिर्वाण ही संकल्पना बुद्ध अवस्था प्राप्त महापुरुषांचे इहलोक सोडून जाणे होय. डॉ. बाबासाहेब हे बुध्द अवस्थेत बुध्द जगणारे होते. सिद्धार्थ गौतमबुद्ध महापुरुषासारखे शीलसंपन्न, विवेकी, तर्कनिष्ठ जीवन बाबासाहेब जगले..
त्यांच्या ह्या धम्ममय जगण्यामुळे त्यांच्या मृतावस्थेला महापरिनिर्वाण म्हटले गेले. धर्म बदलल्याने परिवर्तन होत नाही.. विचार, आचार बदलणे अभिप्रेत आहे.. बाबासाहेबांना ज्या पद्धतीने परिवर्तन हवे होते त्या पद्धतीने आजही दिसत नाही… इतर धर्माप्रमाणे बुद्ध धर्मात गौतमबुद्ध, बाबासाहेब आंबेडकरांची पूजा कर्मकांडाप्रमाणे करतांना दिसून येते.. मूर्तिपूजा, व्यक्तीपूजेच्या विरुद्ध बाबासाहेबांनी अख्य आयुष्य घालविले.. बाबासाहेबांच्या धर्मनिरपेक्षता तत्वाने विचारवंत भारावले त्या विचाराला भारतात दुर्लक्ष करून देशाला विश्वगुरू कसे बनविता येईल..जातीजातीत भेद तयार करणाऱ्या झुंडी निर्माण होतांना जातीअंताचे स्वप्न कसे पाहता येईल..डॉ. बाबासाहेब मानवतेचा विचार मांडणारे तत्वचिंतक असल्याने उच्च विचार जो सर्वांना घेऊन चालणारा आहे त्यालाच प्राथमिकता देत.. त्यांना खऱ्या अर्थाने मानवतेचे व विश्वबंधुतेचे कैवारी उपाधी देता येईल..