1 min read

महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण

Loading

महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण

मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशनतर्फे संवाद व मार्गदर्शन

अमळनेर :

महिला सर्वत्र सर्वार्थाने अपेक्षित आहेत.मात्र पुरुषप्रधान संस्कृती मुळे त्या उपेक्षित आहेत. आता स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिलांनीच धारिष्ट्याने पुढे यावे. सर्वच स्तरावर आवाज उठवावा. लोकसंख्येच्या जवळपास निम्मे असलेल्या महिलांचे लोकसभा, राज्यसभा व विधानसभेत स्थान नगण्य आहे. ही बाब खेदजनक आहे आहे, महिला सक्षमीकरणाशि्वाय कुटुंब, समाज व देशाची प्रगती केवळ अशक्य आहे, असे प्रतिपादन मानिनी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी येथे केले.
मंगळग्रह सेवा संस्था व मानिनी फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री मंगळग्रह मंदिरात ११ डिसेंबर रोजी आयोजित संवाद व मार्गदर्शन शिबिरावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले अध्यक्षस्थानी होते.
संकल्प एच. आर. डी. कॉर्पोरेशन (पुणे)चे डॉ. पी. एम. कदम म्हणाले, की हक्क आणि अधिकार हे भांडण सोडविण्यात महिलेने स्वत:ला बाधून घेतले आहे. त्यामुळे तिला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नाही. मात्र, महिलांनी असे न करता स्वतःचे स्वास्थ्य अन् समाज सुदृढ राखण्याला प्रथम प्राधान्य द्यावे शेतीचे आरोग्य उत्तमरित्या सांभाळावे. जर हा मंत्र प्रत्येक महिलेने अंगीकारला तर शेतीचे नकीच सौंदर्य वाढेल . आपल्याकडून चांगल्या पद्धतीने विविध शेती उत्पादन होईल.
उमेश सोनार बांबू प्रोजेक्टबाबत म्हणाले, की बांबू लागवड करून एका बेटापासून वार्षिक ५० हजार रुपये उत्पन्न मिळविता येते. दिलीप पाटील नैसर्गिक सेंद्रिय शेतीवर म्हणाले, की चुकीच्या पद्धतीने खतांची निवड तसेच वारेमाप कीटकनाशकांचा भडिमार केला जात असल्याने जमिनीचा पोत बिघडला आहे. शेती कसताना माती परीक्षणावर भर द्यायला हवा. तसे केल्यास आरोग्य संवर्धनाच्या कार्यालाही मोठा हातभार लागेल.
तुषार गोरे शेती प्रक्रिया उद्योगासंदर्भात म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत. तसेच शेती प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
प्रा. जयंत शिंदे ब्रांडिंग आणि पॅकिंगबाबत म्हणाले, की कुंकवाचा धनी येतो आणि जातो. मात्र गोंदण कायम राहते, या उक्तीचा महिलांनी शेती करण्यासह विविध खाद्यपदार्थ बनविताना वापर केल्यास नक्कीच स्वतःचा उत्तम प्रकारचा ‘भारत बेटी’ म्हणून ब्रांड उभा राहू शकेल.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना ‘मंगल मानिनी पुरस्कार- २०२२’ ने गौरविण्यात आले. डॉ. कदम यांनी विकसित केलेला ‘आनंदी बटवा’ डॉ. भारती वहाण यांच्या हस्ते देण्यात आला. महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वाटप करण्यात आले .
यावेळी मानिनी फाऊंडेशनचे कृषिभूषण सतीश काटे, डॉ. दिनेश पाटील, महेश पाटील, संजय पाटील, अतुल पाटील, भारती पाटील, सरला पाटील, छाया पाटील, भारती जगदीश पाटील (धुळे) तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, प्रशासन अधिकारी भरत पाटील यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते.
वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *