बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
-डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन

बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात
[डॉ.कलाम पुस्तक भिशी ऑनलाईन जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त मार्गदर्शनात अपर्णा कुळकर्णी – गोवंडे यांचे प्रतिपादन
” बालपणापासून पालकांच्या विषमतापूर्ण संगोपनात तरुण मुलींच्या मातृत्वाच्या अनारोग्याचे बीजं सापडतात ” असे मार्मिक प्रतिपादन अपर्णाजी कुळकर्णी – गोवंडे ( प्रोग्राम मॅनेजर , इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर ) यांनी केले.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव व संलग्न शाखा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित ” मासिक पाळी नेमकी कुठून ? गर्भपिशवीतून की मेंदूतून ” या विषयांन्वये दि.२८ मे २०२३ रोजी संपन्न झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात सौ.अपर्णाजी कुळकर्णी – गोवंडे मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
पुढील मार्गदर्शनात कुलकर्णी – गोवंडे यांनी प्रजनन संस्थेचे अवयव, प्रजनन संस्थेची पूर्वतयारी,मासिक पाळी प्रक्रिया,मेंदूच्या संदेश वहनात रक्ताची विशेषतः हिमोग्लोबिनची मुख्य भूमिका,मासिक पाळीत आहार – विहार व व्यायाम या त्रिसूत्रीचे महत्व प्रामुख्याने जंकफूड व चायनीज पदार्थ खाण्याचे तोटे आणि मोबाईल मधील छचोर मालिकांच्या पाहण्यामुळे तरुणींच्या विकृत भावनांचे होणारे उद्दिपन,हार्मोन्सचे असंतुलन यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या,मासिक काळात कटाक्षपूर्वक घ्यावयाच्या दक्षता,आरोग्यदायी योगासने याबाबत वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन अपर्णाताईंनी केले.
मुलांच्या अति लाड कौतुकात पालक मुलींच्या संगोपनात संस्कृतीच्या नावे दुर्लक्ष करून स्री पुरुष विषमतेला खतपाणी घालत मुलींच्या भावनांचे पदोपदी दमन करतात.पालकांच्या लैंगिक समताशून्य पारंपारिक संगोपनात मुलींच्या अनारोग्याचे मूळ आहे.परिणामी पालकांच्या संगोपनाला सर्वस्तरीय वैज्ञानिक दृष्टी देणारे हे मार्गदर्शन अतिशय सुसंस्कृत व सुबोध आहे .मातापित्यांनी हे मार्गदर्शन कुटुंबात सामुदायिकपणे ऐकावे म्हणजे तरुण भावांचा बहिणींप्रती कर्तव्य भावना वृद्धिंगत होऊन ते निश्चित सत्वशील होतील.अन्य माता भगिनींचा व्यवहारात सदैव आदर करतील.अल्पावधीत अपर्णा कुलकर्णी – गोवंडे यांच्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात माता-भगिनींनी व्हायरल केल्याने त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असे कार्यक्रमाचे संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी आमच्या प्रतिनिधींकडे
कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या.या यशस्वी कार्यक्रमाची संकल्पना पुस्तक भिशी,पाचोरा समन्वयिका तथा आदर्श शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या अरुणा उदावंत यांची होती.मासिक पाळी संदर्भात समयोचित प्रश्न विचारुन कु.भैरवी महाजन,कु.दिपिका राजपूत,सौ.अपर्णा नितुकडे यांनी सहभाग घेतला.पाचोरा पुस्तक भिशी सहसमन्वयिका तथा आदर्श उपक्रमशील शिक्षिका सारिका पाटील यांनी हसत खेळत प्रस्तावना,सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.मार्गदर्शनाचा व्हिडीओ व प्रश्नकर्त्या भगिनींच्या व्हिडीओची तंत्रकुशल मिस्किंग व एडीटींग कामी वेदांत हर्डीकर यांनी अमूल्य योगदान दिले.