
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद.
जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. सकाळी सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री.मोहनजी देसले साहेब (विभागीय सचिव, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी जेष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ.प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव के.सी.ई. सोसायटी) यांना शाल, श्रीफळ प्रदान करून यथोचित सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.केतन नारखेडे (विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र मू.जे. स्वायत्त महाविद्यालय), उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे, प्रा.आर.बी. ठाकरे (पर्यवेक्षक), स्पर्धेचे परीक्षक प्रा.गणपत धुमाळे, प्रा.अमोल देशमुख, प्रा.स्वाती बऱ्हाटे (विज्ञान शाखा समन्वयक), प्रा.उमेश पाटील (कला व वाणिज्य शाखा समन्वयक), प्रा.गणेश सूर्यवंशी (स्पर्धा समिती प्रमुख) उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे सांघिक विजेतेपद बक्षीस रोख रक्कम रु.५०००, प्रशस्तीपत्र, फिरता चषक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.पी.टी. कॉमर्स अँड आर.वाय.के. सायन्स कॉलेज बक्षीस रू. ३०००व प्रशस्ती पत्र असे स्वरूप असलेल्या सांघिक द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर शिरपूरच्या डॉ. पा.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाने बक्षीस रू २०००व प्रशस्तीपत्र असे स्वरूप असलेला तृतीय क्रमांक पटकावला.
वैयक्तिक प्रथम क्रमांक नाशिकच्या संचित रवींद्र गायकवाड या विद्यार्थ्याने पटकावत प्रशस्तीपत्र व २०००रु .चे बक्षीस मिळवले. वैयक्तिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. पा.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रावणी महेश पवार हिने तर तृतीय क्रमांक धरणगाव कॉलेज च्या फाल्गुनी ईश्वर चव्हाण व मृणाल दिनेश भावसार यांना विभागून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अतुल इंगळे व आभार प्रदर्शन स्पर्धा समिती उपप्रमुख डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. स्पर्धा प्रमुख प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी स्पर्धेचे अहवाल वाचन केले. सदर स्पर्धेत एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी सहभागी स्पर्धक म्हणून अनुष्का टकले (बी.एम. सी.सी.कॉलेज पुणे) हिने तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.डॉ.किरण वंजारे (जी.एस.कॉमर्स कॉलेज वर्धा) यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धक, संघ व्यवस्थापक, प्राध्यापक बंधू -भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती सदस्यांसह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.