बालभारती ते बालभारती!

बालभारती ते बालभारती!
रुमधली बाकीची सात पोरं झोपेतून उठायच्या आधीच पहाटे उठून अभ्यास उरकून घेतला. पुस्तकं वह्या पुन्हा सिमेंटच्या रिकाम्या गोणीत बांधून पत्र्याच्या रूमच्या वरच्या लाकडी आढयाला अडकवून ठेवली. पुस्तकं जर वर अडकवून ठेवली नाही तर उंदीर, घुशी त्याची वाट लावत होत्या कारण आमची रूम ही आताच्या सिटी प्राइड जवळच्या गटारावर बनवलेली होती.
गार पाण्याने अंघोळ केली. स्टोव्ह पेटवून आम्हा आठ जणांचा स्वयंपाक केला. प्रत्येकाला दोन दोन तरी भाकरी लागत होत्या. बटाट्याचं भरीत केलं. थोड्या वेळानं बाकीच्या पोरांनीही उठून आवरलं. पाळीनुसार संत्याने भांडी घासून फळीवर ठेवली. सगळी पोरं कामाला निघाली.
मीही ठेकेदाराने दिलेली सायकल घेऊन सकाळी आठ वाजता कामावर निघालो. स्क्रू ड्रायव्हर, पकड अन् भाकरीचे हेंडके असलेली पिशवी
ह्यांडलला अडकवली अन् त्यातच
FYBA चे एक पुस्तकही घेतले जेवणाच्या सुट्टीत अभ्यास करायला उपयोगी पडते म्हणून दररोज एखादं पुस्तक सोबत नेत होतो. जेवणाच्या सुट्टीत इतर कामगार जेव्हा झोपा काढत होते तेव्हा मी अभ्यास करायचो.
एरंडवन्यातून थेट नारायण पेठेच्या दिशेने सायकल दामटू लागलो. पुण्यातल्या ट्राफिकची सवय दोन महिन्यात झाली होतीच. राज इलेक्ट्रिकलमधून इलेक्ट्रिकच्या पाईपचा (100 x 10 फुटी पाइपचा एक बंडल असतो) एक बंडल सायकलच्या नळीला व्यवस्थित बांधून घेतला. सेनापती बापट रोडला सुरू असलेल्या साईटवर तो बंडल पोहोचवायचा होता. एवढा मोठा बंडल सायकलला बांधल्यावर सायकल रेटित रेटीत पायीपायीच चालावे लागणार म्हणून जीव दमणार होता. त्यामुळे वैतागवाडी होणार होती.
सायकलवर कमी बोजा असल्यावर अख्खे पुणे कामानिमित्त पालथे घालताना काहीच वाटत नसे पण असा बोजा म्हटले की कंबरडे मोडून जायचे पण पर्याय नव्हता. एक खाडा म्हणजे चाळीस रुपयाचा फटका बसत होता. त्यामुळे ठेकेदार जे काम सांगेल ते मुकाटपणे करावे लागत होते.
लॉ कॉलेज रोडवर कसाबसा सायकल घेऊन पोहोचलो. घामाघूम अंगाने सायकल रेटीतच होतो. माझ्या पायाला खूप सर्दी व्हायची त्यामुळे स्लीपर सतत सटकायची म्हणून ती काढून सायकलच्या दोन्ही साईडच्या हँडलला अडकववून अनवाणी चालत होतो. त्याची सवय होतीच. चप्पल हँडलला लावण्याचे दोन फायदे होते ते म्हणजे चप्पल जास्त उगळत नव्हती त्यामुळे ती जास्त टिकणार होती. खराब रस्ता दिसल्यावर चप्पल खराब होऊ नये म्हणून ही आयडिया आई अनेकदा वापरायची.
जेव्हा ते पाईप घेऊन मी सिम्बॉयसिस कॉलेजच्या अलीकडच्या चढाच्या वळणावरून डावीकडे सायकल वळवली अन् सायकल रेटायला लागलो त्यावेळेस मात्र माझा कस लागू लागला कारण नारायण पेठेपासून सिंबोयसिसच्या वळणापर्यंत एवढा मोठा एकही चढ लागला नव्हता.
त्या वेळेस रस्त्याने जाणारी माणसंसुद्धा आपल्याला सायकलला रेटायला मदत करणार नाही याची खात्री होती. त्यामुळे खाली वाकून डावा हात डाव्या हँडलला अन् उजवा हात क्यारेजला लावून सायकल जोर जोरात रेटू लागलो तरीही सायकल काय पुढे जाईना. जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता. आईची आठवण येत होती. पायाला खालून चटके बसत होते. त्या वेळेस काय करावे ते सुचत नव्हतं परंतु ठेकेदारांने ते शंभर पाईप सेनापती बापट रोडला कामाच्या ठिकाणी बाराच्या आत पोचवायला सांगितले होते.
बरे नुसते पाईप पोहोचवायचेच नव्हते तर ते पाईप तिथं नेऊन तिथं चालू असलेल्या काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या सहाव्या मजल्यावर चढवायचेसुद्धा होते. त्यानंतर भिंती फोडून त्यामध्ये ते पाईप कन्सिलडसुद्धा करायचे होते. असं ते अवघड व कष्टाचं काम होतं पण शिक्षणासाठी ते सगळं करणं म्हणजे आपण फार मोठं काहीतरी दिव्य करतोय असं काही वाटत नव्हतं. गावाकडे असतो तर हे कामंही मिळालं नसतं अन् शिक्षणही घेता आलं नसतं त्यामुळेच हे कष्ट परवडले असं वाटत होतं.
कसाबसा सिम्बॉयसिस कॉलेजच्या रस्त्याच्या चढावर निम्म्यावरती मी सायकल आणली अन् एक वेळ अशी आली की सायकल पुढे रेटलीच जाईना. माझी ताकद कमी पडायला लागली त्यामुळे सायकल पुन्हा पाठीमागे जाऊ लागली. मी माझ्या परिने प्रयत्न करू लागलो. पूर्ण शक्ती एकवटून सायकल रेटु लागलो तरी सायकल पुढे मात्र जाईना. ती मागेच येऊ लागली. ब्रेक दाबूनही काहीच उपयोग होईना. सायकल उलट मागे येऊ लागली. बरं चाकाला उट्टी लावावी तर त्यासाठी रस्त्यावर आजूबाजूला दगडही सापडेना. जीव मेटाकुटीला आला.
शेवटी माझ्यातली ताकद संपली. सायकल नाईलाजाने सोडून द्यावी लागली. ज्या बाजूला लोड जास्त होता त्या बाजूला सायकल धाडकन पडली.
अचानक रस्त्यात सायकल पडल्याने मागून येणाऱ्या गाडीवाल्यांनी मला शिव्याही दिल्या. मी पटकन पलीकडून जाऊन सायकल उचलण्याचे प्रयत्न करू लागलो पण सायकल अन् त्याच्यावरचे पाईपचे बंडल जास्त जड असल्याने मला काय उचलता येईना.
मी अक्षरशः डोक्याला हात लावून केवीलवाण्या चेहऱ्याने इकडेतिकडे बघू लागलो. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना हात करून मदतीसाठी याचना करू लागलो परंतु कुणीही थांबायला तयार होईना. लोकांना हात करून करून हात दुखून आला परंतु कोणीही थांबला नाही. शेवटी मनात विचार केला की आपल्यासाठी कोण थांबणार? आपण कोण? आपली त्यांची ओळख काय?
पण जास्त वेळ दवडून फायदा नव्हता उन वाढल्यावर डांबरी रस्त्यावर चालणं अवघड जाईल म्हणून पुन्हा प्रयत्न करू लागलो. कारण रस्त्यात पडलेली सायकल पाहून एखादा पोलीसबिलीस आला तर काय बोलेल याची माझ्या मनाला चिंता लागली होती,
सायकल पडल्यामुळे सायकलचे नुकसान झालं तर ठेकेदार शिव्या घालील त्याचीही चिंता लागली होती,
त्याचसोबत ज्या बाजूला सायकल पडली होती त्याच बाजूला पाईप होते अन् ते जर तुटले फुटले असतील तर त्या पाईपची किंमत ठेकेदार आपल्याकडून वसूल तर करणार नाही ना याची सुद्धा चिंता लागली होती.
ह्याच चिंतेच्या वावटळीत सापडलेलो असताना
डाव्या बाजूला पाहिलं तर एक बिल्डिंग दिसली. तिथल्या गेटवरल्या वॉचमनकडे गेलो. थोडसं पाणी मागितलं. त्याने बाजूच्या नळावर प्यायला सांगितलं. त्याला मी घाबरत घाबरतच विचारलं,
‘ दादा माझी सायकल पडलीय व मला तेव्हढी सायकल उचलायला थोडी मदत करता का हो ?’
तो बिचारा लगेच आला. त्यानं सायकल उचलायला मदत तर केलीच पण तो जो अवघड चढ होता त्यासाठी सायकल रेटायलासुद्धा त्याने मदत केली. त्याचे फार मोठे उपकार झाले. मनात वाटलं गरीबच गरिबाच्या मदतीला धावून येतो. त्याच्या पाया पडायचे होते पण सायकल सोडून तसे करता आले नाही.
तिथून जाता जाता बालभारती असे नाव मला तिथे दिसले. मराठी शाळेत आपण जी बालभारती वाचली. शिकलो. त्याच बालभारतीबद्दल मला खूप अप्रूप वाटलं, की ‘ राव बालभारतीचे पुस्तक आपल्याला इथूनच येत असेल अन् या बालभारतीच्या गेटवर आज आपल्याला जायला मिळालं. ‘
‘ चला कामाच्या निमित्ताने का होईना अशा महत्वाच्या ठिकाणी जायला मिळालं ‘ म्हणून मी तो आनंद घेऊन पुढे गेलो. कामाच्या ठिकाणी पोचलो. कामावरच्या पोरांना सगळं सांगितलं. त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही कारण ते शिकत नव्हते फक्त काम करत होते. मी मात्र एवढ्या लांबून सायकल रेटीत आणली अन् सायकल पडली त्याचाही खूप त्रास झाला पण त्यापेक्षा आपल्याला बालभारती ह्या पुस्तकाचे कार्यालय बाहेरून का होईना पण आज बघायला मिळाले ह्याचा आनंद जास्त झाला होता. त्याच आनंदात माझा दिवस खूप चांगला गेला.
असो,
हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे कवी शशिकांत हिंगोणेकर सरांच्या स्मृतीशेष
‘ चमेली भाऊसाहेब हिंगोणेकर ‘ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार
‘ एक भाकर तीन चुली ‘
या कादंबरीस नुकताच जाहीर झाला. नुसता जाहीरच नाही केला तर अवघ्या एक तासात शशिकांत सरांनी माझ्या खात्यावरती पुरस्काराची पाच हजार रुपयांची रक्कम त्वरित ट्रान्सफर सुद्धा केली. असे खूप कमी आयोजक आहेत जे कवी लेखकाबद्दल अन् त्यांच्या कलाकृतीबद्दल एवढा आदर बाळगतात, त्यांचा एवढा सन्मान करतात. त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना सलाम.
शशिकांत सरांनी अतिशय सन्मानपूर्वक ह्या पुरस्काराचं स्मृतीचिन्ह त्यांच्या मित्राजवळ पाठवून दिले अन् तोच पुरस्कार स्वीकारायला मी परवा त्यांच्या मित्रांच्या ऑफिसला गेलो. बालभारतीचे डायरेक्टर आदरणीय के.बी. पाटील सरांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारताना माझं हृदय भरून आलं. त्यांनी शशिकांत सरांच्याच आत्मीयतेनं अन् तितक्याच सन्मानपूर्वक ते स्मृतिचिन्ह मला त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान केलं. त्यावेळी माझे ऊर भरून आले. डोळे क्षणात पाणावले. मला काहीच सुचेना.
कारण…
वर सांगितलेली १९९९ सालची सगळी गोष्ट आठवली. हुंदका कसाबसा आवरत असं वाटलं की ज्या ठिकाणी आपण पाईपचा बंडल नेताना सायकल घेऊन पडलो होतो अन् तिथल्या ऑफिस बाहेरच्या वॉचमनने आपल्याला मदत केली होती आज तिथल्याच बालभारतीच्या डायरेक्टरच्या हस्ते आपल्याला एक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जातोय.
ही गोष्ट, ही घटना कदाचित काहींना फारसी महत्वाची वाटणार नाही पण माझ्या मनाला मात्र फार आनंद देणारी वाटली. उभारी देणारी वाटली. बळ वाढवणारी वाटली.
मनात आलं की दिवस कधीच बसून राहत नाही, आपण जरी धडपडलो, कोलमडलो तरी डगमगून न जाता पुन्हा उठले पाहिजे अन् चालायला लागले पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, जिद्द पाहिजे, कष्टाची तयारी पाहिजेच
अन् जे करतोय त्यात सातत्य पाहिजे.
बस्स… यश मिळतंच अन् अपयशाच्या पायऱ्या कितीही जास्त असल्या तरी एक ना एक दिवस यशाची पायरी आपल्या आयुष्यात येतेच.
फक्त लढत राहीलंच पाहिजे एवढं मात्र खरं!
- देवा झिंजाड