अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि.१३ जून रोजी दुपारी २.३० रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती.बैठकीत खालील मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्याचे मा.आयुक्त यांनी मान्य केले आहे.
सदर बैठकीत सेविका व मदतनिसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधनवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली.त्यावर शासनाकडे सदर प्रस्ताव सादर करण्यात येईल असे श्री.पगारे यांनी सांगत सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून तो निर्णयाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे बैठकीत आयुक्त यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देणेबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्यसेविका पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे मार्गदर्शन घ्यावे लागेल असेही मा.आयुक्त पगारे यांनी बैठकीत नमूद करत नागरी विभागातील मुंबई आणि पुणे सारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.सेवानिवृत्त,मयत झालेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची थकित एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्यांच्या आत दिल्या जातील. असे सांगितले.
त्याबरोबरच मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे अंगणवाडी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाईल तसेच मोबाइल रिचार्जची रक्कम वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.
नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ८ किमी पेक्षा जास्त अंतरावर बोलावल्यास टीएडीए त्यांना देण्याचा आदेश काढला येईल.आदिवासी दुर्गम भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना १०० व ७५ रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल असेही संघटना प्रतिनिधींना श्री. पगारे यांनी बैठकीत सांगितले.
तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन लागु करून मागील फरक देण्याबाबत आदेशित केले जाईल आणि आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल तसेच आहार चांगल्या प्रतीचा पुरविण्याबाबत सक्त ताकीद दिली जाईल असेही नमूद केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल. असे आयुक्तांनी सांगितले. बैठकीत आयुक्त श्री. कैलास पगारे यांच्यासह उपायुक्त विजय क्षीरसागर,श्रीमती संगीता लोंढे,सह आयुक्त श्री काकडे तसेच संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्र्वर यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न पार पडली असे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.