आधुनिक सावित्री अरुणा देवरे व जुळ्या लेकरांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सत्कार
पतीच्या निधनानंतर त्यांच्या ईच्छा,आकांक्षा व ध्येयांना केले पुनर्जिवित
सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक पुस्तक भिशी जळगाव तर्फे अरुणा देवरे ३५ व्या वर्षी दहावी त्यांच्या जुळ्या लेकरां सोबत उत्तीर्ण झाल्याच्या सन्मानार्थ भावपूर्ण सत्कार जळगाव येथील शिवकॉलनीतील निवासस्थानी २१ जून २०२४ करण्यात आला.
वैधव्यानंतर अरुणा ताईंचा प्रेरक जीवन संघर्ष : पती प्रविण देवरे यांनी २०२१ मध्ये १० वी परीक्षेचा फॉर्म भरला मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने परीक्षा देता आली नाही.नवव्या इयत्तेत शाळा सोडल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी मुलांसोबत अरुणा ताईंनी स्टेट बोर्डातून दहावीची परीक्षा ८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.१८ वर्षानंतर या आधुनिक सावित्रीने पतीच्या इच्छा,आकांक्षा व ध्येयवादाला पुनर्जीवीत करून स्वप्नपूर्ती केली.पतीच्या पश्चात मनोधैर्य खचू न देता स्वाभिमानपूर्वक कौटुंबिक जबाबदारी सांभाळली. अर्थोत्पादनासाठी शिवणकाम व रिद्धी ब्युटी ॲन्ड हेल्थ केअर पार्लर या लघुव्यवसायाची कसरत लिलया सांभाळून लेकरांसोबत रात्रंदिन अभ्यासही केला ! पुन्हा मिळालेल्या फावल्या वेळात त्या सामाजिक कार्यातही योगदान देतात.अरुणा देवरे ताईंचा वेदनेचा वेद करणारा हा ध्येयवादी जीवन संघर्ष एकल विधवा महिलांसाठी प्रेरणादायी तथा दिपस्तंभासमान आहे. ]
मुलांनी सीबीएसईतून शालांत परीक्षेत सुकन्या स्मिताने ८०% तर ध्रुवने ७४% गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळविले.
प्रारंभी समांतर विधिसेवा सहाय्यक समुपदेशक भारती कुमावत यांच्या हस्ते अरुणा देवरे,सामाजिक कार्यकर्ता निवेदिता ताठे यांच्या हस्ते स्मिता देवरे व सुलोचना बाविस्कर ( अध्यक्ष, सिद्धी विनायक गणपती मंदिर संस्थान, शिवकॉलनी) यांच्या हस्ते ध्रुव देवरे यांचा तसेच संयोजक तथा सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते अरुणा देवरे यांचा शाल व ‘श्यामची आई ‘ ( साने गुरुजी ) संस्कारक्षम कादंबरी देऊन विशेष भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
स्मिता व ध्रुव भावंडांना महात्मा ‘जोतीबा फुले यांचे अमर जीवन ‘ हे शास्त्री नारो बाबाजी महाधट पाटील लिखित व महानायिका हे पी.डी.पाटील लिखित आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जीवन चरित्र ही प्रेरणादायी पुस्तकांची ग्रंथभेट देऊन लुल्हे यांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक ध्येयपुर्तिसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी निवेदिता ताठे यांनी महात्मा जोतिबा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमाही भेट दिली.शैक्षणिक व व्यवसायिका समस्या आल्यास हक्काने प्रासंगिक मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन अरुणा देवरे यांना दिले.
