कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित
कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सभा संपन्न.
के.डी.एम.सी.ने खेळाडूंना सुविधा,मैदाने उपलब्ध करून द्याव्यात,आणि क्रीडा स्पर्धांचे पंच मानधन व इतर सुविधा न दिल्यास क्रीडा शिक्षक व खेळाडू रस्त्यावर येऊन आंदोलन करतील.
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ क्रीडा संघटक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांचा अध्यक्षतेखाली, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे, डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे सचिव जगदीश उगले, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक कृष्णा बनगर, निवृत्त क्रीडा संघटक गोपाळ सुर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यालयात अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आले होती.
यावेळी, कल्याण डोंबिवली शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे सदस्य व उत्कृष्ट क्रीडा संघटक श्री अनिल घुगे यांची जिल्हा क्रीडा अधिकारी पदी निवड झाली म्हणून सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आगामी जिल्हा क्रीडा स्पर्धाचे नियोजन आयोजन करताना सर्वांनी नियम व योग्य क्रिडांगणाच्या विचार करावा आणि महानगरपालिका क्रीडा विभागाकडून योग्य ते सहकार्य मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान उत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा बनगर यांनी केले. डॉजबॉल खेळाचे प्रमुख प्रताप पगार यांनीही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि स्पर्धेचे मानधन तत्परतेने मिळावे , खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
कल्याण पूर्व चे क्रीडा संघटक प्रविण खाडे यांनी यावेळी सांगितले की, प्रत्येक वर्षी स्पर्धा नियोजनाबाबत मानधनाबाबत आणि स्पर्धेचे मुख्य घटक विद्यार्थी म्हणजे खेळाडू यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत कोणतेही धोरणात्मक असे निर्णय अद्याप महानगरपालिका क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेले नाहीत. सन 2024-25 च्या क्रीडा स्पर्धा आयोजित करताना नियोजनानुसार सर्व गोष्टींची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करून सर्व क्रीडा शिक्षकांना विश्वासात घेऊन असे जिल्हा क्रीडा स्पर्धेचे नियोजन करण्यात यावे. कल्याण डोंबिवली क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा समिती तयार करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. क्रीडा स्पर्धा घेताना अधिकृत पंचांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
कब्बडी खेळाचे उत्कृष्ठ खेळाडू पंच मार्गदर्शक शिधांत सर यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की कल्याण डोंबिवली क्षेत्रात देखील विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, आणि प्रत्येक मैदानावर खेळाडूंना ड्रेस बदलण्यासाठी सुविधा असावी, तसेच सुसज्ज असे स्वच्छ्ता गृह असावे, अशी सर्वांनी एकमुखी मागणी करावी असे आवाहन केलं. सर्व क्रीडा संघटक, युवा शिक्षक बंधू भगिनींनी एकत्र येऊन आपले संघटन मजबूत करणे आवश्यक आहे असे टिटवाळा परिसरातील तरुण क्रीडा संघटक शरद मगर यांनी सांगितले. तसेच जगदीश उगले, गोपाळ सुर्यवंशी, आणि इतरही क्रीडा संघटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सभेचे अध्यक्ष महादेव क्षीरसागर यांनी सर्व माहिती घेतल्यावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की , कल्याण डोंबिवली मधील आरक्षित मैदानांची माहिती घेतली आहे, आणि आपल्या स्पर्धांसाठी हे आरक्षित मैदाने उपलब्ध करून घेण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकत्र येऊन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना भेटून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी व समस्या तातडीने सोडवण्यासाठी मनपा आयुक्त यांच्याशी संपर्क करणे आवश्यक आहे.त्यासाठी लवकरच सर्वांनी एकत्र येऊन तसे नियोजन करण्यात येईल. व या वर्षी सर्व क्रीडा स्पर्धा व्यवस्थित आणि नियोजनबध्द ,पर पाडण्यासाठी , आणि पंच मानधन त्वरित मिळण्यासाठी शारीरिक शिक्षण आणि शिक्षक मंडळ कमिटी तयार करून मनपा क्रीडा अधिकारी आणि ही कमिटी यांनी सूत्रबद्ध नियोजनातून पुढील स्पर्धा आयोजित करण्यात येतील असे सांगितले. नेरूळकर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनंत उतेकर यांनी उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले. व राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.