साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड
साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी साहिल भीमराव बैसाणे याची कथा प्रेरणादायी आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत, साहिलने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि वेगवेगळ्या परीक्षा तो देत होता.. त्यानंतर अग्निवीर सेवेसाठी निवड झाली. त्याचा नुकताच शाळेमध्ये उत्साहात सत्कार करण्यात आला.
साहिलच्या कुटुंबात दोन भाऊ असून, वयोवृद्ध आई-वडील शेतमजुरी करून आपले उदरनिर्वाह करतात. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर साहिलने आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवले आहे. त्याच्या या यशाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन,एच.ओ.माळी,एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के
शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजीराव पाटील, गुरूदास पाटील तसेच संघर्ष अभ्यासिका केंद्राचे माजी विद्यार्थी, आणि ग्रामस्थांनी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्कार सोहळ्यात, साहिलच्या यशाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
“देवगाव देवळी येथील माजी विद्यार्थी जेव्हा नोकरीला लागतो, तेव्हा आम्हाला त्याच्यासारखा सुखद आनंद अनुभवता येतो. येणाऱ्या काळात अजून विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यांना अधिक मेहनत व अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल, आणि कोणत्याही क्षेत्रात स्वतःला झोकून द्यावे लागेल. शाळेचे, गावाचे, आणि आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे,” असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले.