राज्यातील 157 विशेष शिक्षक बारा वर्षानंतर उभारणार आनंदाची गुढी!
अॅड. योगेश पाटलांच्या लढ्याला यश; अथक प्रयत्नांनी मिळाले थकित वेतन
अमळनेर ः अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक) स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील 157 विशेष शिक्षकांना थकित वेतन मिळाले आहे. याबाबत अॅड. योगेश यांनी विविध न्यायालयात अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बारा वर्षांनंतर हे विशेष शिक्षक आनंदाची गुढी उभारणार आहेत.
अॅड. योगेश एम. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयासह, नागपूर, तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेमुळे त्यांना न्याय मिळाला आहे.या योजनेत राज्यातील 1000 पेक्षा जास्त विशेष शिक्षक पगाराविना मागच्या 12 वर्षांपासून ते काम करीत असताना 24 वेळा तपासणीत पात्र होते. मात्र, 25 व्या तपासणीत त्यांना चुकीच्या पध्दतीने निकष लावून अपात्र करण्यात आल्याने शिक्षकांनी व्यथित होऊन अॅड. योगेश एम. पाटील यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर खंडपीठ तसेच औरंगाबाद खंडपीठात अवमान व रिट याचिका दाखल केल्या. अवमान याचिकेत विशेष शिक्षकांच्या वास्तवतेवर न्यायालय यांचे लक्ष केंद्रीत करीत असतांना शासकीय यंत्रणा यांच्या सोबत योग्य तो न्यायीक समन्वय साधत 157 विशेष शिक्षकांना 12 वर्षाचे थकीत वेतन मिळवून देण्यात अॅड. योगेश एम. पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. 12 वर्षानंतर राज्यातील 157 विशेष शिक्षकांच्या कुटूंबासाठी थकित वेतन मिळाल्याने या वर्षाचा गुढीपाडवा नक्कीच त्यांच्या करीता नाविन्यपुर्ण साजरा करण्याचा योग शिक्षकांसह त्यांचा कुटूंबाला मिळाला. याकरीता राज्यभरातील सर्व विशेष शिक्षक वर्गामधून अॅड. योगेश एम. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
राज्यातील 157 विशेष शिक्षकांना व त्यांच्या कुटूंबाला आर्थिक सधनतेसह नवीन मराठी वर्षाची गुढी उभारण्याचा योग आला आणि त्यास मी निमित्त झालो, याचा मला मनस्वी आनंद आहे. राज्यातील इतरही विशेष शिक्षकांना तातडीने थकित वेतन मिळण्यासाठी तसेच त्यांना पात्र होण्या करिता सर्वोत्तपरी न्यायालयीन प्रयत्न करणार, असल्याचे अॅड. योगेश पाटील यांनी सांगितले.