**प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव**
-प्रा प्रकाश धर्माधिकारी
ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत.
काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा प्रारंभ.बुधवार होता.प्राचार्य व्ही पी नेने यांनी लिहिले आहे की अमळनेरला इतकी उष्णता होती की दिवसभरात पिण्यासाठी घागरभर पाणी लागत होते. बुधवारी काॅलेज सुरू झाले म्हणून Wednesday Club *बुधवार मंडळाची* स्थापना करण्यात आली.स्टाफ अकॅडमी हे ‘बुधवार मंडळाचे’ व्यापक स्वरूप होय.उत्तर महाराष्ट्रातील या पहिल्या वहिल्या काॅलेजमध्ये १९४५ साली १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता आणि प्रताप काॅलेजचे उदघाटन सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ डाॅ जयकर यांच्या शुभहस्ते झाले.
श्रीमंत प्रताप शेठजींनी काॅलेजचे पहिले प्राचार्य कानेटकर यांना फर्ग्युसन काॅलेज मधून, प्राचार्य लाड यांना बनारस हिंदू विद्यापीठातून, प्रा दामले यांना इंग्लंडहून, प्रा दीक्षित यांना कानपूरहून, प्रा फाटक यांना धारवाडहून, प्रा गर्गे यांना बागलकोटहून,प्रा गद्रे यांना पुणे आकाशवाणीतून,प्रा मुंजे यांना लाहोरहून,प्रा बेडेकर यांना भांडारकर संशोधन केंद्रातून, प्राचार्य नेने यांना फर्ग्यूसन काॅलेज मधून अमळनेरला आणले.हे प्राध्यापक मानांकित संस्थांमधून आल्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.
श्रीमंत प्रताप शेठजींनी काॅलेजला प्रथम आणि नंतरही भक्कम आर्थिक पाठबळ दिले. दानशूर एस आर बंगाली यांनी काॅलेजला ४ एकर जमीन दान दिली.१९४८ मध्ये श्रीमंत प्रताप शेठजी दुपारी ४ वाजता काॅलेज मध्ये आले आणि ३४००० रू दिले.त्वरीत वसतीगृहाचे काम सुरू झाले.दानशूरांनी व्यापक दृष्टी ठेवून इमारती, क्रिडांगणे, प्रयोगशाळा उभारल्या तर निष्णात अध्यापकांनी त्या इमारतींमध्ये प्राणतत्व भरले.
१९४९ या वर्षी प्रताप काॅलेजने मेट्रो गोल्डविन मेयर
( MGM ) या जागतिक चित्रपट निर्मिती करणार्या संस्थेशी सामंज्यस्य करार ( MOU ) करून विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक,शास्रीय चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.
१९५० साली नोबेल पारितोषिक मिळविणार्या ख्यातनाम मादाम मेरी क्यूरी यांच्या कन्येने भारतीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत प्रताप काॅलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी निबंध सादर केल्या प्रसंगी त्यांचे कौतुक केले.धडपडणार्या मुलांना घडविणार्या साने गुरुजींनी १९५१ साली ऑर्थर रोड,मुंबई येथून ‘ प्रतापीय ‘ मध्ये जे लिखाण केले ते महृराष्ट्रभर प्रसिध्द झाले.१९५८ ला विद्यापीठ अनुदान मंडळाने काॅलेजला इमारती उभारण्यासाठी भरघोस मदत दिली.१९५९ साली लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी प्रताप काॅलेजच्या विद्यार्थ्यां समोर ओजस्वी भाषण देऊन युवा शक्ती आणि विद्यार्थी चळवळीची राष्ट्रज्योत पेटवली. मानवेंद्रनाथ राॅय यांच्या समाजवादी तत्वज्ञानाने प्रभावित झालेले ‘ लोकसत्ता ‘ चे संपादक ह रा महाजनी प्रताप काॅलेजच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून आले तर येथील शिक्षण पध्दती व गुणवत्ता पाहून त्यांनी काॅलेजची प्रशंसा केली. २४ डिसेंबर १९६५ ला लाखो आठवणी व समृध्द वारसा मागे ठेवून दानशूर प्रताप शेठजी या जगातून निघून गेले.८५ वर्षाच्या जीवन यात्रेत श्रीमंत प्रताप शेठजींनी पितामह भिष्म यांच्या प्रमाणे अलौकिक कार्य पार पाडले.
१९९५ हे प्रताप काॅलेजचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. प्राचार्य डाॅ माळी यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात १०० चर्चासत्र,कार्यशाळा, विविध विषयांच्या परिषदांचे सुरेख आयोजन केले.एका परिषदे मध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या कादंबरीकार महाश्र्वेता देवी कलकत्त्याहून आल्या होत्या. मोठे लोक साधेच असतात. सकाळी ७ च्या पॅसेंजरने त्या आल्यात. साधी सुती कलकत्ता साडी नेसलेल्या १०० कादंबर्यांच्या लेखिका महाश्र्वेता देवी थंडीत अमळनेर रेल्वे प्लॅटफाॅर्मवर उभ्या होत्या.मोटार नाही.बडेजाव नाही.नारायण ठाकूरच्या टांग्याने काॅलेज मध्ये आल्या.मुख्य कार्यक्रमा नंतर रात्री त्यांच्या हस्ते होळी पेटविण्या आली. होळीच्या ज्वालांचा प्रकाश आणि आकाशात पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश —— आम्हा सगळ्यांना दिदी आकाश देवते प्रमाणे भासल्या. १९९९ साली साने गुरूजींच्या जन्मशताब्दीला भारत सरकारने साने गुरूजींच्या पोस्टल तिकिटाचे विमोचन प्रताप काॅलेज मध्ये केले. माझा सांगण्याचा मुद्दा असा की गेली ७५ वर्ष प्रताप काॅलेज मध्ये रोज अविस्मरणीय घटना पार पडल्या. विद्यार्थी घडत गेले. प्रताप काॅलेजचे संस्कार घेऊन बाहेर पडले.देशभर कार्य करीत राहिले.
एक लाख तेहतीस हजार ग्रंथसंपदांचा ठेवा बाळगणार्या प्रताप काॅलेजच्या उत्कट भावनेने ओथंबलेल्या लाखो आठवणी प्रत्येकाच्या हृदयात दडलेल्या आहेत.पदांसाठी येथे कुणीच झुरत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी, शेतबांधावर काम करणार्या, स्मशानाजवळ राहणार्या तरूणांना प्रगतीचा रस्ता दाखविण्याचे कार्य ७५ वर्ष येथे सुरू आहे.गेली ७५ वर्ष विद्यापीठाचेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे शैक्षणिक नेतृत्व अमळनेर कडे,प्रताप काॅलेज कडे राहिले आहे.हजारो लाखो विद्यार्थांचे आनंदाचे सुखाचे दिवस प्रताप काॅलेजमध्ये राहिले आहेत. विद्यार्थ्यांना कवी, लेखक,शास्रज्ञ,कलाकार, इतिहासकार,अभिनेते,विचारवंत ऐकायला,बघायला प्रताप काॅलेजमध्ये मिळायचे. असंख्य उपक्रमातून प्रताप काॅलेजने हजारो वकिल,डाॅक्टर,शिक्षक, इंजिनिअर,शेतकरी,व्यापारी, आमदार, खासदार,उद्योजक, कलाकार,देशाची जडण-घडण करणारे कार्यकर्ते घडविले. शेकडो चढउतार बघत, हजारो वळणं घेत प्रताप काॅलेज अमृत महोत्सव साजरा करीत आहे. ग्रंथालयातील सोनेरी अक्षरांची पुस्तके आणि परिसरातील वृक्ष-पाखरं आम्हाला रोज साद घालतात,माघारी बोलवितात. प्रताप काॅलेजच्या परमपावन वास्तुला आणि हजारो अलौकिक व्यक्तीमत्वांना वंदन करून काॅलेजच्या पहिल्या पायरीला स्मृतिपुष्प वाहून धन्य होऊ या !!
लेखक
प्रा प्रकाश धर्माधिकारी
९ ८ २ २ ० ९ १ ९ २ ३