• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास!

Jun 17, 2025

Loading

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास!

अमळनेर प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा करणारे डॉ. शरद बाविस्कर हे केवळ एक कुशल बालरोग तज्ज्ञच नाही, तर एक उत्कृष्ट कलाकारसुद्धा आहेत. कस्तुरबा बाल रुग्णालयात नवजात बालकांचे जीवन वाचवतांना त्यांनी आपल्या कलेच्या आवडीला देखील वेळ दिला आहे.
प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना कलाक्षेत्राची गोडी होती. 2015-16 च्या सुमारास त्यांनी आपल्या हौशीला मूर्त स्वरूप दिलं. विशेषतः कोरोना काळात वेळ मिळाल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारची स्केचेस तयार करायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी तब्बल 2500 पेक्षा अधिक चित्रे साकारली आहेत.
त्यांच्या चित्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील 400 ते 500 स्केचेस, विविध देवतांचे पोर्ट्रेट्स आणि प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे यांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये अमळनेर येथे भरवलेल्या त्यांच्या चित्रप्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांचं मनःपूर्वक कौतुक केलं होतं.
त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि पत्नी डॉ. हिरा बाविस्कर यांचे मोलाचे सहकार्य आहे. डॉ सौ. हिराताई बाविस्कर यांनाही कलाक्षेत्राची आवड असून त्या गणपतीच्या सुंदर मूर्ती आणि चित्रे तयार करण्यात निष्णात आहेत. महिला मंचामध्येही त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
डॉ. बाविस्कर यांना विचारले असता की, “आपले आदर्श कोण?” तर त्यांनी सांगितले की, प्रा. एस. एन. माळी (धुळे) आणि बिरारी सर हे त्यांचे प्रेरणास्रोत आहेत.
एक विशेष बाब म्हणजे कोणाचाही वाढदिवस असो – श्रीमंत किंवा गरिब – कोणताही भेद न करता ते त्या व्यक्तीसाठी स्केच तयार करून एक प्रेरणादायी भेट देतात. त्यांच्या मते, “आवड असेल तर सवड मिळते”, आणि त्यांना ही सवड मिळवण्यासाठी कलेची निस्सीम निष्ठा आहे.
त्यांनी आजवर अनेक क्षेत्रांतील नामवंतांना त्यांच्या कलाकृती भेट दिल्या आहेत. 1 जून रोजी पत्रकार ईश्वर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास त्यांचे स्केच तयार करून भेट दिली. त्या प्रसंगी त्यांनी त्यांच्या भविष्यातील कलायोजनांचाही मनमोकळा संवाद साधला.
या वेळी डॉ. अवेश शेख (अक्कलकुवा) हेही उपस्थित होते.
आरोग्यसेवा आणि कला या दोन्ही क्षेत्रांत झोकून देऊन काम करणाऱ्या डॉ. शरद बाविस्कर यांना मराठी लाईव्ह न्युज
‘ तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *