इ.अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी त्वरीत सोडवा.– कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची आग्रही मागणी.
जळगांव: संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून इ.अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत असून पूर्वी केवळ मुंबई, मुंबई उपनगरे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र या वर्षापासून याची व्याप्ती वाढवत संपूर्ण राज्यात एकाच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र ३०जूनपासून सुरू झालेल्या पहिल्या फेरीत बऱ्याचशा त्रुटी असून त्यामुळे विद्यार्थी, पालक वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या त्रुटींचे निरसन त्वरित व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे वतीने मा.संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पुणे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आलेले आहे. या त्रुटी पुढीलप्रमाणे..
1) राज्यातील काही विभागात विशेषत: कोल्हापूर विभागात इतर मागासवर्ग तसेच काही संवर्गांसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. सध्या सेतू व तहसील कार्यालयात कामे खूप असल्याने सदर प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. वास्तविक हे प्रमाणपत्र प्रवेशानंतरही विद्यार्थी जमा करू शकतात. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी हमीपत्र घेऊन त्यांचे प्रवेश नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राविना करण्यात यावेत.
2) इन हाऊस कोटा व मॅनेजमेंट कोटा पहिल्या फेरीत पूर्ण न झाल्यास प्रत्येक फेरीत या कोट्यातील प्रवेश करण्याची संधी देण्यात यावी. सदर कोट्यातील जागा कुठल्याही परिस्थितीत सरेंडर करण्यात येऊ नये.
3) विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करताना अनेक सायबर कॅफेमधील लोकांनी फॉर्म्समध्ये काही चुका केलेल्या आहेत, या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी विद्यार्थ्याना प्रत्येक फेरीत देण्यात यावी.
4) दुसऱ्या फेरीत क्षमतेएवढे प्रवेश होतील या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्राधान्यातील महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या देण्यात यावी.
5) पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यास दुसऱ्या फेरीत पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी संधी द्यावी.
6)विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात, त्यांच्या संवर्गात, कमीत कमी अडचणीत प्रवेश होतील अशा पद्धतीने सुकर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यापुढे व्हावी हीच नम्र अपेक्षा.
या संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता त्वरीत योग्य ती दुरुस्ती व्हावी अशी आग्रही पुनश्च विनंती डॉ.संजय शिंदे (राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ) यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे,प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, तसेच आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.