
जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश*
*जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश*
सांगली, २१ जुलै : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान प्रशासकीय मान्यता प्राप्त सर्व कामांची तात्काळ सुरुवात करून ती विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावी,कामांची प्रगती नियमितपणे अहवालाद्वारे सादर करण्यात यावी, जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यांचे कार्यारंभ आदेश १५ ऑगस्ट २०२५ पूर्वीच देण्यात यावेत असे निर्देश संबंधित सर्व यंत्रणांना चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सर्व यंत्रणांनी गतवर्षाअखेर वितरीत निधीचे सर्व विनियोग दाखले जिल्हा नियोजन कार्यालयाकडे वेळेत सादर करून निधीचा ताळमेळ करून घ्यावा, असे स्पष्ट करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सन 2024-25 पासून वित्त विभागाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा (VPDA) ही कार्यप्रध्दती अनिवार्य केली आहे. त्यानुसार आहरित केलेल्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत निधी खर्च करणे बंधनकारक आहे. ही कार्यपध्दती लक्षात घेऊन सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी विहित वेळेत खर्च करण्यासाठी जबाबदारीने नियोजन करण्याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार सुविधा देणारी कामे प्रस्तावित करावीत. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारी वैशिष्टपूर्ण (युनिक) कामे हाती घ्यावीत. तसेच, पावसाळ्यापूर्वी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून, पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामांचे कार्यादेश द्यावेत. त्यामुळे मार्चअखेर प्राप्त निधी खर्च होईल. गतवर्षातील केलेल्या अशा कामांना आपण भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका व नगरपालिकांनी सौर प्रकल्पांसाठी प्रस्तावांसंदर्भात कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी पाटील यांनी सांगली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपयोजना) निधीतील सन 2023 – 24 व 2024 – 25 अंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणा व महानगरपालिका व नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यंत्रणांचा योजनानिहाय कामांचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत, बांधकाम, आरोग्य, जलसंधारण, शिक्षण, समाजकल्याण, बालकल्याण आदि विभाग तसेच महानगरपालिका, जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या सहा नगरपरिषदा व कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, शिराळा व आटपाडी या पाच नगरपंचायती यांचा सन 2023-24 व 2024-25 मधील मंजूर कामे, प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी, कार्यारंभ दिलेली कामे, पूर्ण झालेली कामे, त्यांची आर्थिक व भौतिक प्रगती यांचा तपशीलवार आढावा घेतला.
या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहआयुक्त (नगरप्रशासन) दत्तात्रय लांघी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, तसेच माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते.