
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .
महाराष्ट्र मध्ये संतांची अप्रतिम अशी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी निर्माण केलेला विविध जाती-धर्मातील लोकांचा गोतावळा हा समतेचा संदेश देणारा प्रवाह आहे. संत नामदेवांनी विषमतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व संत एकत्र करून भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जातीभेदाच्या, चातुवर्ण्य व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल हे एकेश्वरवादाचे प्रतीक म्हणून सारा महाराष्ट्र समतेच्या विटेवर उभा केला. अशा महान संतांमध्ये संत सावता माळी हे संत भक्ती पेक्षा कर्माला प्राधान्य देणारे होते. आपले काम सोडून भक्ती न करता कामातच भक्ती मानून त्यांनी पंढरपूरला जाणे टाळले. आपण कृषी संस्कृतीचे वारसदार आहोत. कृषी हीच आमची काळी माय आहे. तिची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे संत सावता माळी यांच्या घराण्यामध्ये म्हणजेच त्यांचे आजोबा दैवू माळी यांची पंढरपूरला वारीमध्ये जाण्याची परंपरा होती. दैव माळी यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा . यातील पुरसोबा नियमित वारीला जाणारे गृहस्थ होते. सावता महाराजांचे ते वडील होते. सावता महाराजांच्या घरात विठ्ठल भक्ती करण्याची पारंपारिक परंपरा होती. त्यांची आई व वडील दोन्ही विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरामध्ये नेहमी ग्रंथांचे वाचन होत असे. संत नामदेवांनी सुरू केलेली विद्रोहाची परंपरा सावता महाराज यांनी चालू ठेवली. सावता महाराजांनी काम सोडून भक्ती करण्यापेक्षा कर्म करून भक्ती करण्यावर भर दिला. सावता महाराज यांच्या आईचे नाव नंगुताबाई होते. सावता महाराजांचे मूळ गाव अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर हे होते. भेंड हे गाव जवळ असल्याने अरण भेंड असे त्यांचे मूळ गाव म्हटले जाते. पंढरपूर हे देवस्थान गावापासून जवळ होते. सावता महाराजांना दोन मुले होते. विठ्ठल व नागाई अशी त्यांची नावे होती. सावता माळी यांचे पत्नी जनाबाई या सुद्धा धार्मिक होत्या. जनाबाईंचे माहेर भेंड हे होते.त्या काळामध्ये पंढरपूरला जाणाऱ्यांची वारकरी परंपरा होती. त्या काळामध्ये वारी म्हणजे पंढरपूरला सर्व जाती-धर्मातले संत एकत्र येऊन ज्ञान आदान प्रदान करीत असत. ज्ञान घेण्याची ही परंपरा म्हणजे वारी होय. परंतु त्या काळामध्ये सुद्धा काम सोडून पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली होती. अशा काळात सावता माळी यांनी पंढरपूरला जाण्यापेक्षा आपले निहित कर्म प्रामाणिकपणे करणे म्हणजे खरी भक्ती आहे असे सावता माळी यांनी आपल्या अभंगातून स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या अभंगांमध्ये “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी…”संत सावता माळी यांचा विठ्ठल कामातून व्यक्त होतो. आपल्या कामावर निष्ठा ठेवून त्यांनी भक्ती केली. कर्माला प्राधान्य दिले. केवळ वारीमध्ये जेवणाची सोय होते म्हणून त्यांनी वारी केली नाही. देवाचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने अंधश्रद्धा न मानता आपले कर्म चांगल्या पद्धतीने करणे हे त्यांनी महत्त्वाचे मानले. संत सावता माळी यांचा जन्म अरण येथे १२५० ला झाला.”आमची माळीयाची जात शेत लावू बागाईत” आमचा जो व्यवसाय आहे तो आम्ही प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही त्यांनी आपल्या अभंगातून दिलेली आहे. सावता महाराजांचे एकूण ३७ अभंग उपलब्ध आहेत. नामस्मरणाला जो देण्यापेक्षा कामात विठ्ठल पाहण्याची दृष्टी त्यांनी जगाला दिली. कर्मकांडात गुंतून राहण्यापेक्षा आपल्या कर्मामध्ये व्यस्त राहून विठ्ठलाचे स्मरण करण्यावर त्यांनी महत्व दिले. पंढरपूरला केवळ हौस म्हणून जाणाऱ्या लोकांना त्यांनी चपराक दिली आहे. पंढरपूरला जात असताना काही हवसे,गवसे केवळ मनोरंजन म्हणून पंढरपूरला जात असतात. काही काही लोक पंढरपूर मध्ये राहुन जेवणावळी उठवितात. वारीला जाताना महापुरुषांनी म्हणजे संतांनी केलेल्या चांगल्या कृतीची आठवण करणे म्हणजे वारी होय. कर्म करून सावता महाराजांनी खऱ्या अर्थाने वारी केलेली आहे. कामात राम भजने हे त्यांचे मुख्य कर्तव्य होते. आळशी, ऐतखाऊ वृत्तीवर त्यांनी प्रहार केलेला आहे. जातिभेदाच्या कारणाने पंढरपूरला प्रवेश न देणाऱ्या पुरोहितांना कामामध्ये विठ्ठल आहे हे सांगण्याचे धाडस सावता महाराजांनी केलेले आहे. पंढरपूर हे एकमेव संस्थान आहे त्या ठिकाणी बहुजनातील असंख्य लोक जातात. त्या ठिकाणी कोणताही पैसा लागत नाही. दानासाठी लुबाडणूक होत नाही. सर्वच गरीब ,वंचित ,दीन दुबळ्यांचा हा देव आहे. पूजा करताना वेगवेगळ्या देवाची पूजा न करता महाराष्ट्रातील संतांनी बहुजनांचा देव विठ्ठल म्हणून उभा केला. काही संतांनी या देवालाच बुद्ध म्हटलेले आहे. महाराष्ट्रातील संतांना एकत्रित करून बहुजनांना ज्ञानवंत करणारी परंपरा म्हणजे वारी होय. आजच्या युगात संतांच्या अभंगावर अमाप पैसा घेऊन कीर्तने करणारे अनेक आहेत. संत तुकारामांनी व सर्व संतांनी निस्वार्थ देवाची भक्ती, विचार समाजाला समजावण्याचे सांगितलेले आहे. आज कीर्तनाच्या नावाने पैशांचा बाजार भरला आहे. काही ठिकाणी अन्नदानाच्या नावाने लोकांकडून पैसे घेऊन विविध कार्यक्रम केले जातात. गावातील गरीब, वंचित, दीन भुकेला झोपलेला आहे याची साधी जाण त्यांना नसते. संत सावता हे नाव त्यांच्या नावाला ,वृत्तीला सार्थक आहे.साव म्हणजे खरा, ता म्हणजे धारण करणारा होय. खऱ्या गोष्टीची ओंजळ ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे सावता माळी. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली..
लेखक
पत्रकार
एस.एच.भवरे