

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात अभाविप चे निकाल वाटप आंदोलन
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे कॅम्पस च्या होम सायन्स डिपार्टमेंट च्या तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राचे निकाल चार महिने होऊन देखील लागले नव्हते. अभाविप, डेक्कन नगरच्या कार्यकर्त्यांनी या विषयात वारंवार निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, संबंधित प्रशासनाने या विषयावर कायम टाळाटाळीची उत्तर दिली. आज परीक्षा होऊन ४ महिने उलटले. तसेच, विद्यार्थी परिषदेने निवेदन दिले त्याला देखील दीड महिन्याचा कालावधी झाला. तरी, या प्रशासनाने हा विषय मार्गी लावला नाही.
प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यापीठात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रथम सत्राचा च निकाल लागला नाही आणि आता द्वीतीय सत्राच्या परीक्षेची वेळ आली आहे. हे फक्त होम सायन्स डिपार्टमेंट पुरतेच मर्यादित नसून कॅम्पस मधील इतर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा या अडचणींना विद्यार्थिनींना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थिनींच्या हक्काच्या शिक्षणावर अडचण निर्माण करून विद्यापीठ प्रशासन दूर्लक्ष करत असल्याने त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी व विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर च्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी आज दिनांक १६ मार्च २०२३ ला एस एन डी टी, महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात निकाल वाटप आंदोलन केले. यावेळी, संबंधित डिपार्टमेंट चा निकाल लवकरात लवकर लावावा. तसेच, या विषयातील पुढील माहिती लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी करण्यात आली. डिपार्टमेंट मधील संबंधित प्राचार्यांनी आंदोलन स्थानी येऊन लवकरच निकाल लावू, सोबतच या विषयातील कामाचा पुढील अहवाल अभाविप च्या संकेतस्थळावर पाठवून देऊ असे आश्वासन दिले.
या आंदोलनात अभाविप पुणे महानगर सह मंत्री स्नेहल जाधव, डेक्कन नगर सह मंत्री अनुश्री विसपुते, सृष्टी जगताप तसेच इतर विद्यार्थीनी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.