
श्री.एम.बी. चौघुले महाविद्यालयात सामाजिक न्याय विभाग योजनांच्या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!
ठाणे,भिवंडी दि.२७.(मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील विशेष ग्रामीण भागातील सुपरिचित असलेले श्री महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय भिवंडी,अंजूर फाटा येथे नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी
व या घटकांना त्याचा लाभ कशा प्रकारे घेता येईल, याची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयांमधील या प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून योजनांचा लाभ कसा घेता येईल या बद्दल विद्यार्थी जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एक दिवशीय प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे स्टँडिद्वारे माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे भिवंडी तालुक्यातील
श्री महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय,भिवंडी,अंजूर फाटा येथे एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, नवउद्योजकांसाठी असलेली स्टँडअप योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी असलेली मिनी ट्रॅक्टर योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष श्री इंद्रपाल बाबुराव चौघुले, उपाध्यक्ष श्री.श्याम बाबुराव चौघुले,उपाध्यक्ष श्री. शशिकांत महादेव चौघुले, सचिव श्री. सुभाष महादेव चौघुले,महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. दहिवले, सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यांनी सदर प्रदर्शनास भेट देऊन शासनाच्या स्थिर स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.