
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतर
आजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात चांगले वक्ते घडवण्याचे हे मोठे कार्य ते करत आहेत.नुकताचं शिवजयंती पंधरवडा साजरा करून नंतर
दि. ५ एप्रिल ते ५ मे तात्यासाहेब जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव( मास) साजरा करण्यात येत आहे.या महापुरुषांचे खरे वारसदार होऊन त्यांचा कार्याचा प्रचार व प्रचार ते करीत आहेत.तसेच आपल्या युवाक्रांती ग्रंथालयाच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील सर्व स्तरातील वाचकांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून आपली सामाजिक बांधिलकी जपत असल्याने त्यांचा ह्या कार्याची दखल घेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पाचोरा येथील गो.से हायस्कूलच्या आवारात १ मे महाराष्ट्र दिनी एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन आयोजित ‘सामाजिक न्याय व सलोखा’ परिषद पार पडली.या कार्यक्रमात प्रा. अशोक पवार यांना नर्मदा बचाव आंदोलनाच्या परिवर्तनवादी नेत्या, समाजसेवक
मेधाताई पाटकर यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सोबत विचार मंचावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर, हमाल मापाडी संघटनेचे सुभाष लोमटे, प्राध्यापक गणपत धुमाळे ,साहित्यिक जयसिंग वाघ, खलील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास अमळनेर येथून प्रा.डाॅ.राहुल निकम, बापूराव पाटील,चेतन जाधव,प्रेमराज पवार,डि.ए. पाटील ,पत्रकार अजय भामरे,संजय सुर्यवंशी, नरेंद्र पाटील, लालचंद नागदेव,सोपान भवरे,रियाज शेख,राजू शेख आदी उपस्थित होते.तसेच अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र छात्र भारती ,राष्ट्र सेवा दल, मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक चळवळ आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.अशोक पवार यांना गौरविण्यात आल्यामुळे सर्व क्षेत्रातील मान्यवर , पदाधिकारी व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.