विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक -माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक –
कल्पना चव्हाण
असोदा – शिक्षण ही सतत आणि अव्याहत चालणारी महत्त्वपूर्ण आणि जीवन घडवणारी अशी बाब आहे आपल्या जीवनानुभवांना एक दिशा आणि त्यासोबतच आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विकासाचे ध्येय हेच शिक्षकाचे सर्वोच्च पारितोषिक असल्याचे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण यांनी आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी महिला बालकल्याण अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी विद्यार्थिनींच्या असणाऱ्या शैक्षणिक गरजा, शिक्षणातून होणारी प्रगती त्यासोबतच सामाजिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना येणारे चांगले वाईट, अनुभव यासंदर्भात मार्गदर्शन करत समाजातल्या काही वाईट प्रवृत्ती कडून होणारे बॅड टच या संदर्भात विचार मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्य गीत महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जळगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी जी महाजन, ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या कोल्हे,ग्रामसेवक देवानंद सोनवणे उपस्थित होते. याप्रसंगी शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या सांस्कृतिक विभागांतर्गत वकृत्व,निबंधलेखन,हस्ताक्षर स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तसेच प्रत्येक इयत्तेमधून प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी केले तर सूत्रसंचालन एस. एस. जंगले, अतिथी परिचय एस. के. राणे राजपूत यांनी करून दिला. बक्षीस वाचन एस.डी.कचरे,भावना चौधरी , प्रशांत कोल्हे यांनी तर आभार वृषाली चौधरी यांनी मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.