पदार्पणवीर मयंक यादवने लखनौला विजयीपथावर आणले
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर शनिवारी चालू आयपीएल सत्राच्या नवव्या दिवशी अकराव्या सामन्यात भारतीय क्रिकेटला सुखद धक्का देणारा वेगवान गोलंदाजीचा नवा सितारा जन्मास आला. प्रसंग होता लखनौ सुपर जायटंस व पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचा. या सामन्यात लखनौने पंजाब किंग्जला केवळ मयंक यादव या सुपर एक्सप्रेस गोलंदाजांच्या गतीच्याच नव्हे तर अचूकतेच्या जोरावर नमवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने आठ बाद १९९ धावा केल्या. तर पंजाब एक दमदार सुरुवात मिळूनही केवळ पाच १७७ या धावसंख्येवरच अडखळत थांबले. शिखर धवन व जॉनी बॅरिअस्टोची झुंझार खेळी व्यर्थ गेली असे म्हंटल्यास चुकीचे ठरू नये. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर लखनौचे सलामीवीर क्लिंटन डिकॉक व केएल राहुल यांनी ३५ धावांची बऱ्यापैकी सुरुवात करून दिली. राहुल फारसा चमकला नाही मात्र डिकॉकने पंजाबच्या गोलंदाजांचे पिसं काढताना दमदार अर्धशतक ठोकून लखनौला १९९ या भक्कम धावसंख्येवर पोहोचवलं. देवदत्त पडिक्कल व स्टोईनीस लौकिकाप्रमाणे खेळले नाही. परंतु वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन डिकॉक सोबत चांगल्या पैकी भागिदारी करून गेल्यामुळे डिकॉकच्या खेळाला व लखनौच्या डावाला आकार मिळाला. कृणाल पांड्याही उपयुक्त खेळी करून गेला. रवि बिश्नोई व मोहसिन खानची बॅट बिलकुल न चालल्याने दोनशेचा टप्पा लखनौच्या नजरेत असतानाही पार करता आला नाही. पंजाबकडून सॅम करनने तीन, अर्शदीप सिंगने दोन तर कगिसो रबाडा व राहुल चाहर यांनी एक-एक बळी घेऊन आपली जबाबदारी पार पाडली. दोनशेसारख्या फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर कर्णधार शिखर धवन व जॉनी बॅरिअस्टो यांनी खणखणीत सुरूवात करून देताना १०२ धावांची शानदार सलामी दिली. तेंव्हा पंजाब हा सामना लिलया खिशात घालेल असे वाटत होते. परंतु नियतीच्या म्हणण्यापेक्षा या सामन्याद्वारे आयपीएल पदार्पण करणाऱ्या मुळतः दिल्लीचा असलेल्या मयंक यादवच्या मनात वेगळेच होते. मागच्या सत्रात तत्कालीन मेंटॉर गौतम गंभीरच्या खास अग्रहास्तव मयंकला लखनौच्या ताफ्यात केवळ वीस लाखात घेण्यात आले. परंतु मयंकला त्या सत्रात दुखापतीने घेरले. त्यामुळे तेंव्हा तो पदार्पण करू शकला नव्हता. या सत्रात तो तंदुरुस्त होऊन परतला. मात्र त्याचा कारनामा जवळून बघायला गौतम गंभीर लखनौच्या ताफ्यात नव्हता. गंभीरने यावेळी केकेआरशी सलगी साधली आहे हे आपणास ठाऊक असेलच. मयंक यादवच्या तुफानी माऱ्यापुढे पंजाबचे फलंदाज अचानक सैरभैर झाले. त्याने टाकलेल्या डावातील बाराव्या षटकातील चौथ्या वेगवान चेंडूवर २९ चेंडूत ४२ धावा करणारा बॅरिअस्टो चुकला व स्टोईनच्या हाती एक सोपा झेल देऊन परतला. त्यानंतर आलेला प्रभरनसिंगही १९ धावा करून मयंकच्या वेगापुढे नमला. जितेश शर्माला मयंकचा १५० कि.मी. वेगाचा चेंडू समजलाच नाही व तो बाद झाला. त्याबरोबरच पंजाबचा विजयाचा आशाही संपुष्टात आल्या. शिखर धवनच्या वेगवान ७० धावाही मयंकच्या धारदार गोलंदाजीपुढे फिक्या पडल्या. लखनौकडून मोहसिन खानही प्रभावी ठरला. त्याला दोन बळी मिळाले. ५० चेंडूत सात चौकार व ३ षटकारांनिशी सजलेली ७० धावांची विजयाकडे घेऊन जाणाही शिखर धवनची महत्त्वपूर्ण खेळी मोहसिननेच संपवली. त्यानंतर त्याने सॅम करनलाही पुढच्याच चेंडूवर शुन्यावर बाद करून पंजाबच्या संकटात वाढच केली. लियाम लिव्हींगस्टोन २८ व शशांकसिंग धावांवर ९ नाबाद राहिले. तीन बळी घेणारा मयंक यादव सामनावीर ठरला. एकवीस वर्षीय मयंक पहिल्याच सामन्यात सर्वांच्याच गळ्यातला तावीत बनला. मुळचा दिल्लीचा असलेला मयंक, रिषभ पंत, शिखर धवन आणि आशीष नेहरा ज्या दिल्लीतील सोनेट क्रिकेट क्लब मधून पुढे आले त्याच क्लबचा विद्यार्थी आहे. मयंकने या सामन्यात चार षटकात चोवीस चेंडू टाकले. त्यातील नऊ चेंडू १५० कि.मी. पेक्षा जास्त वेगाचे होते. त्याने टाकलेला १५५.८ कि.मी. वेगाचा चेंडू या आयपीएल सत्रातला सर्वात वेगवान चेंडू ठरला. सतत १४० च्यावर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या मयंक कडून आता अपेक्षा वाढतील. लखनौवाले त्याचा चांगलाच कस काढून घेतील. मात्र भविष्यात भारताकडून सातत्याने खेळायचे असल्यास मयंकला फिटनेस सांभाळून आपले कौशल्य जपावे व सोपासावे लागेल. तरच भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिर्घ काळ सेवा देता येईल. या सामन्यात त्याने निव्वळ वेगाने चेंडू फेकले नाहीत तर स्विंग व सिमचा पुरेपुर उपयोग करताना दिशा व टप्पा यावर पुर्ण नियंत्रण ठेवून मारा केला. त्याचा लाभ त्याला मिळालाच व लखनौलाही एक अशक्यय विजय सहजसाध्य झाला. मयंकच्या या कामगिरीने प्रभावित झालेल्या कॉमेंटेटर्सनी तर त्याचे दिल्ली एक्सप्रेस असे नामकरण करून टाकले. यामुळे मयंकवर मोठी जबाबदारी आली आहे. मात्र या मोठ्या कौतुकाने हुरळून न जाता डोकं ताळ्यावर ठेऊन पुढील मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. तरच त्याला पुढे जात टिम इंडियाचे दिर्घकाळ प्रतिनिधित्व करता येईल.
लेखक : –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो. नंबर -९०९६३७२०८२