शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे
शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात रयतचे सचिन झगडे यांची उमेदवारी


शिक्षकांनी शिक्षकालाच मतदान करावे – सचिन झगडे
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
अशातच रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांमधून प्रथमच श्री सचिन रमेश झगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या संदर्भातील भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे , विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेले प्रस्तावावर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून आलेल्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मूल्यमापन केले जावे आणि नंतरच तो प्रस्ताव ठरावात मंजूर व्हावा त्याचा कायदा बनला पाहिजे. या मतदारसंघातील उमेदवारांची वैचारिक, नैतिक व सामाजिक बैठक चांगली असावी असे संविधानकर्त्यांचे मत होते.
सध्याची निवडणूक मात्र विविध पक्षांच्या नेत्यांचा आखाडा बनली आहे. तसेच राजकारणातील नेत्यांच्या कलगीतुऱ्याने गाजत आहे. शिक्षण व्यवस्थेतील चाललेला अनाचार, बोकाळलेला भ्रष्टाचार, जुनी पेन्शन चा प्रश्न, शाळा बाह्य कामे, शिक्षणाचे खाजगीकरण व कंपनीकरण, वन नेशन वन सिलॅबस, संविधानकर्त्यांनी ठरवलेला सहा टक्के शिक्षण खर्च पुन्हा लागू केला जावा, केजी टू पीजी मोफत शिक्षण , संप करण्याचा काढून घेतलेला अधिकार , टप्पा अनुदान असे सर्वसामान्य शिक्षकांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिलेले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये शिक्षण व्यवस्थाच खिळखिळी करून टाकण्याचे षडयंत्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने ठरवलेले आहे. या विरोधात लढाई लढावी लागेल. अन्यथा हे संस्थाधिश शिक्षण व्यवस्थेचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाहीत याची शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी नोंद घेतली पाहिजे. शिक्षक मतदार संघाला राजकीय आखाडा बनू नये यासाठीच आपण उमेदवारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत जेवढे उमेदवार उभा राहिलेले आहेत त्या सर्व उमेदवारांमध्ये सचिन झगडे हे सर्वाधिक पदव्या प्राप्त उमेदवार आहेत. डीएड, एम ए , बी एड , एम कॉम सेट , डीएसएम, एलएलबी , पीएचडी (ॲपि) एवढ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत.
गेल्या वीस वर्षापासून ते सामाजिक चळवळीमध्ये तसेच शिक्षकांच्या प्रश्नावर संघर्ष करत आहेत. चार राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी शिवराय महात्मा फुले , शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याराणी होळकर या महापुरुषांच्या जीवनावर व्याख्याने दिली आहेत. सत्यशोधक विचारांचे प्रबोधनकार म्हणून त्यांची ख्याती आहे.
ज्याप्रमाणे शेळ्यांचे नेतृत्व लांडगा करू शकत नाही, त्याप्रमाणे शिक्षकांचे नेतृत्व धनदांडगे संस्थाचालक संस्थाधीश करू शकणार नाहीत म्हणून सर्व शिक्षकांनी शिक्षण वाचवण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला प्रथम पसंतीचे क्रमांकाचे मतदान करावे, खंबीरपणे एका सर्वसामान्य शिक्षकाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहावे, असे आवाहन सचिन झगडे यांनी सर्व शिक्षक मतदारांना केले आहे.