• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Jun 29, 2024

Loading

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

 

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.

या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे सुलभपणे दर्शन होईल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक विजय पुजारी यांनी व्यक्त केली तर संतोष आरेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या या विशेष योजनेचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *