• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार!

Aug 3, 2024

Loading

तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा !

अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनी यंदा अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेची नवी दिशा घेतली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले आणि त्यांच्या विरोधकांनी आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच दरम्यान, अजित पवारांनी देखील आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सत्तेत प्रवेश करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रक्रियेत अजित पवारांचे सहकारी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र, जनतेच्या मनात असलेल्या गद्दारीच्या भावना लक्षात घेता, एनडीएला लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. शरद पवारांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अनिल पाटील यांच्या भविष्यातील निवडणुकीबद्दल टिप्पणी केली आहे की, “अनिल पाटील पुढील निवडणुकीत निवडून आलेले दिसणार नाहीत.” त्यामुळे अमळनेर विधानसभा क्षेत्रात शरद पवार यांची काय रणनीती असू शकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवार तिलोत्तमा पाटलांनी एक अनोखे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या एकनिष्ठतेचा ठाम संदेश देण्यासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी हा स्टॅम्प पेपर सुपूर्त केला आहे.

त्यांच्या प्रतिज्ञापत्रात तिलोत्तमा पाटलांनी स्पष्ट केले आहे: “जर मला आपल्या पक्षामार्फत उमेदवारी मिळाली आणि निवडणुकीत विजय प्राप्त झाला, तर मी आपल्या पक्षाशी आणि आदरणीय साहेबांशी एकनिष्ठ राहीन. कुठल्याही फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडून गद्दारी करणार नाही. मी आपल्याला आणि माझ्या मतदार संघातील जनतेला प्रामाणिक राहीन.” शरद पवारांविषयीची सध्या जनतेत असलेली सहानुभूती लक्षात घेता आपलाच विजय होईल याची खात्री असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

तिलोत्तमा पाटलांचा 32 वर्षांचा राजकीय अनुभव असून त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, जिल्हा बँक, पणन महामंडळ अशा विविध संस्थांवर काम केले आहे. त्यांचा दीर्घकालीन राजकीय प्रवास आणि पक्षांतर न करणारा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या एकनिष्ठतेचा एक ठळक दर्शक आहे. त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या संस्थापक जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष महिला काँग्रेस, प्रदेश सरचिटणीस फादर बॉडी आणि नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून काम करत आहेत.

तिलोत्तमा पाटलांनी केलेली ही प्रतिज्ञा, त्यांच्या निष्ठेची आणि विश्वासार्हतेची खात्री देते, आणि हिच प्रतिज्ञा आगामी निवडणुकीत त्यांना एक मजबूत आधार मिळवून देईल असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *