लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी
उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान
अमळनेर – केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षर ज्ञान अवगत केले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य रशियात प्रसिद्ध झाले तसेच 27 भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरित झाले ही बाब सर्वांसाठीच अभिमानास्पद असून त्यांचा जीवनपट प्रेरणादायी असल्याचे मत उपक्रमशील शिक्षक उमेश काटे यांनी व्यक्त केले.
अमळनेर येथील जी.एस. हायस्कूल मध्ये झालेल्या “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे एक यशस्वी महापुरुष” या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक जीवनावर व्याख्यान देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे, शिक्षक प्रतिनिधी एस पी वाघ, देवयानी भावसार, जी डी देशमुख, श्रीमती भदाणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उमेश काटे पुढे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या “माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया काहली ” या लावणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपली एक वेगळीच छाप पाडली. लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लोकनाट्याचे जनक म्हणतात. “ये आजादी झुटी है देश की जनता भूकी है, “जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव” तसेच “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरांच्या श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.” या वाक्यानी त्यांना अजरामर केले आहे. डी. एम. निघोट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——-
अमळनेर – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी उपस्थित उमेश काटे, बी एस पाटील आदी