• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …”

Aug 16, 2024

Loading

डॉ. उत्तमराव पाटील तसेच लीलाताई पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्याचे लढ्यातील “क्रांती पर्व …”

“आई घे हाती तिरंगा आणि टाक उडी स्वातंत्र्य यज्ञात ..!तुरुंगात जाऊन आपली आई शहीद झाल्याचं आम्हाला आनंद होईल.. तू अमर व्हावेत हीच आमची इच्छा आहे …!”
जगाच्या इतिहासात एक मुलगा आपल्या आईला आपल्या देशासाठी शहीद होण्याच्या पत्र लिहितो. अंगावर शहारे आणणारी अशी ही घटना आहे. ही जगावेगळी घटना अमळनेर शहरात घडली. डॉ.उत्तमराव पाटील यांनी लिहिलेलं हे पत्र आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे . तसेच हृदयस्पर्शी सुद्धा आहे. नऊ ऑगस्ट १९४२च्या क्रांती लढ्यात डांगरी या अमळनेर तालुक्यातील छोट्याशा गावातील हे सुपुत्र लढायला सज्ज होते . त्यांचा आंदोलनातील सहभाग हा असाच जगा वेगळा होता. डॉ.उत्तमराव पाटील ,दशरथ नाना, लहान भाऊ शिवाजी आणि पत्नी लीलाताई..!
हे सर्व स्वातंत्र्यासाठी लढत असताना आपली आई वार्धक्याने असाह्य झाली आहे. ब्रिटिश शासनाच्या “शूट अ्ंट साईट “ही ऑर्डर निघालेली आहे. आजूबाजूचे कोणीच आईला मदत करत नाहीये . ब्रिटिश शासनाचे पोलीस गावभर फिरत आहेत. त्यामुळे घाबरून कोणीच मदत करत नाहीये .अशा वेळी डॉ. उत्तमराव पाटलांनी हे पत्र लिहिले.
ही खरच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी, गोष्ट आहे .
खरंतर याची सुरुवात ही नऊ ऑगस्ट ला झाली .जसे महात्मा गांधींनी आझाद मैदानातून ब्रिटिश शासनाला “चलेजाव “चा नारा दिला .त्याचवेळी साऱ्या भारतभर एक जबरदस्त स्वातंत्र्याची लाट उसळली.
अशावेळी –
” उत्तम सारा देश पेटला आणि माझे अमळनेर शांत कसे ?”
असे साने गुरुजींचे पत्र उत्तमराव पाटला ना मिळाले. स्वतः ते आणि लिलाताई गुरुजींच्या पत्राने अत्यंत प्रभावी झाले. देश प्रेमाच्या भावनेने ते पेटून उठले. सगळीकडे स्वातंत्र्याची लहर उसळली .संपूर्ण अंमळनेर शहरातील व्यापारी, विद्यार्थी ,शेतकरी, शेतमजूर डॉ. उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटित झाले. पत्रके काढली. हस्तपत्रके निघाली. सुभाष चौकात मोर्चा अडवला गेला तरीही ते मागे हटले नाहीत .देश स्वातंत्र्याच्या चळवळीत सारे एक दिलाने लढा देत होते. अमळनेर शहरात एक जबरदस्त अशी लाट उसळली होती .पू. साने गुरुजींचा प्रभाव असलेल्या या गावात डॉ. उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली” जिंकू किंवा मरू” या भावनेने जनता पेटून उठली. गुप्त बैठका देशमुख वाड्यातील रंगराव देशमुख यांच्या वाड्यात होऊ लागल्या. हजारोच्या संख्येने लोक गोळा झाले.
-आणि मोर्चा निघाला.
सर्वात अगोदर मामलेदार च्या टांग्याची राख- रांगोळी करण्यात आली .तसे मामलेदार काळोखात पळाले. सदरचा मोर्चा पोस्ट ऑफिसच्या दिशेने निघाला .पोस्ट ऑफिस जाळले गेले. तिजोरी फोडण्याच्या प्रयत्न झाला. पण ती फुटली नाही म्हणून बाजूच्या विहिरीत फेकली गेली. अशाच जमलेला हा हजारोच्या मोर्चा कोर्टाच्या दिशेने गेला. कोर्टाची ही राख रांगोळी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनाची जेवढे ही प्रतीक होती. त्यातीलच रेल्वे स्टेशन हे सुद्धा जाळण्यात आले.
खरंतर असं संबंध महाराष्ट्रात कुठेच घडलं नाही. ते या शहरात, अंमळनेर शहरात घडले. या स्वातंत्र्य च्या लढ्यात ब्रिटिश शासनाच्या प्रतीकां ना जाळून त्याच्या ज्वाला नी हे शहर उजळून निघाले. त्यानंतर हा सर्व मोर्चा कचेरीच्या दिशेने निघाला. कचेरीवर तिरंगा ध्वज फडकवायचा हाच निर्धार मोर्चामध्ये होता.
परंतु त्याचवेळी पोलिसांनी सैर गोळीबार सुरू केला. जमाव दिशाहीन होऊन बेभान झाला.
.त्यात रंगराव देशमुख यांचा घर गढी बळीराम याला गोळी लागली .आणि तो शहीद झाला. इतरही खूप जखमी झाले. देशाचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजित झाला. अमळनेर शहरात “मार्शल लां” लावला गेला.
– आणि अशा वेळेला या मार्शल ला विरुद्ध लढा देण्यासाठी स्वतः लीलाताई पाटील पुढे आल्या. त्या वेळेला त्या गरोदर होत्या. त्यांनी शालेय विद्यार्थिनी ,त्यावेळचे कॉटन मार्केटचे सेक्रेटरी परब यांची बहीण आणि इतर चार सहा मुलींनी सोबत घेऊन एक छोटासा मोर्चा काढला. हातात तिरंगा ध्वज घेऊन –
“ऑगस्ट क्रांती जिंदाबाद”
” इंग्रज सरकार मुर्दाबाद ”
अशा घोषणा देत हा छोटासा मोर्चा सराफ बाजारातून निघाला. सोबत दशरथ नाना त्यांच्या साथीला होते. संपूर्ण शहरात स्मशान शांतता होती. अशात फक्त या माता-भगिनींच्या आवाजाने ब्रिटिश शासनाचे पोलीस जागे झाले.
मोर्चा लालबागच्या उघड्या मैदानावर आला.
पोलीस चक्रावले .हातात दंडुके पण समोर विद्यार्थिनी आणि त्यांच्यासोबत लीलाताई पाटील घोषणा देत होत्या. त्यांना दशरथ नाना साथ देत होते .काय करावे हे पोलिसांना सूचे ना ? अशातच ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हुकूम झाला. “क्या देखते हो..? हटाव झेंडा लगाव दंडे..!”
समोर लीलाताई पाटील आणि त्यांच्या चार सहा विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ,सोबतीला दशरथ नाना घोषणा देतच होते.
असा तो अविस्मरणीय क्षण होता.
पोलिसांना आदेश दिला. पोलिसांनी हातातला दंडा अगोदर दशरथ नाना वर चालवला. त्यानंतर गरोदर असलेल्या लीलाताई पाटलांच्या पोटावर त्यांनी काठ्या चालवल्या .तरीही त्यांनी हातातील तिरंगा ध्वज सोडला नाही .लहान मुली घाबरून पळाल्या .दशरथ नानाला सोबत आलेल्या पोलीस व्हन मध्ये कोंबण्यात आले .तशाही स्थितीत ते ओरडत राहिले ,
“ऑगस्ट क्रांती जिंदाबाद!”
लीलाताई पाटलांना सुद्धा पोलीस व्हॅन मध्ये कोंबण्यात आले .त्यांनी तशाही परिस्थितीत हातातील तिरंगा ध्वज सोडला नाही.
देश स्वातंत्र्य लढ्यातील ही अभूतपूर्व घटना होती .देशात वेगवेगळ्या ठिकाणी चळवळी झाल्या. आंदोलने ,मोर्चे,लाठी मार गोळीबार सर्व काही झाले . परंतु अमळनेर शहराच्या ह्या स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं .त्याला कारण होते.
ब्रिटिश शासनाची प्रतीके, पोस्ट ऑफिस ,रेल्वे स्टेशन कचेरी जाळण्यात आली. त्याचबरोबर ब्रिटिश शासनाचा कठोर” मार्शल ला “तोडला गेला. आणि त्यामुळे ब्रिटिश शासन हे चवताळून उठले. त्याच वेळेस त्यांनी संपूर्ण अंमळनेर शहराला दीड लाखाचा सामुदायिक दंड बसवला..!
-असं भारतात कुठेच घडलं नव्हतं.
आपणा सर्वांसाठी हा गौरवशाली इतिहास आपल्या शहराने घडवला .
ब्रिटिश शासनाचा दीड लाखाच्या सामुदायिक दंड हा
“9 ऑगस्ट१९४२च्या क्रांती त” अमळनेरच्या घराघरातील प्रत्येक नागरिक सहभागी होतात याचे प्रतीक होते.
याचा आपणास अभिमान पाहिजे.

गोकुळ बागूल
२१, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर, जिल्हा जळगाव.
मो.९४२२२७६१४०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed