विद्यार्थांनी संशोधन क्षमता विकसित करावी -डॉ.अरविंद बडगुजर यांचे प्रतिपादन
———————————————-
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी भूगोल विभागात “संशोधन प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र” या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. अरविंद ए. बडगुजर (उपप्राचार्य, डी.डी.एस.पी. महाविद्यालय, एरंडोल) हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचेवप्राचार्य डॉ.अरुण बी. जैन होते.
प्रारंभी डॉ. बडगुजर यांनी संशोधन, शोध, आविष्कार आणि नवनिर्मिती यातील फरक साध्या उदाहरणांसह स्पष्ट केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील संशोधनाच्या महत्त्वावर भर दिला. संशोधनामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकासित होते, जिचा पाठ्यपुस्तक आणि वर्ग शिकवणीत अनेकवेळा अभाव दिसतो. याशिवाय, संशोधनामुळे माहिती (डेटा) गोळा करून त्याचे वर्गीकरण व विश्लेषण करण्याची क्षमता विकसित होते, जी कौशल्ये विद्यार्थ्यांना भविष्यकाळातही उपयोगी ठरतात.
डॉ.बडगुजर यांनी डेटा सादरीकरण साधने आणि त्यांचा वापर यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रकल्प अहवाल कसा वैज्ञानिक पद्धतीने लिहावा, याची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी सोप्या भाषेत दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि या संबंधी विस्तृत माहिती मिळवली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन यांनी सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत संशोधन आणि प्रकल्प लेखन हा एक अनिवार्य घटक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. विद्यार्थी संशोधन कौशल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आज मागे राहू शकत नाही असे सांगितले. डॉ. अरुण जैन यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हा मंत्र यावेळी दिला.
भूगोल विभागप्रमुख डॉ. कैलास निळे यांनी डॉ.अरविंद बडगुजर यांचे आभार मानले व त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र महाजन यांनी केले व प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. किरण गावित यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी भूगोल विभागातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. ए. ए. शिरसाठ, प्रा. भूषण पवार, प्रा. चंद्रशेखर वाडे, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. प्रीतम पावरा उपस्थित होते. तसेच, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. प्रविण धनगर, श्री. महेश (बाळा) राजपूत यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.