“जीवन म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच जीवन ”
नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील
जळगाव प्रतिनिधी
संघर्षाशिवाय जीवन हे सुंदर नाही. पण आज मी अशा एका जीवनची गोष्ट सांगणार आहे. ज्याचा जगण्याचा संघर्ष खूप सुंदर आहे. जसं पद्मपुष्प चिखलात उगवते, अनमोल मोती शिंपल्याच्या पोटातच समुद्राच्या तळाशीच सापडतात तसे समाजातील कर्तुत्ववान मुले हे गरिबीतूनच घडत असतात हा जणू काही नियमच आहे. हा नियम पुन्हा एकदा जीवन सिसोदे या तरुणाने सिद्ध केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडचणीचा एखादा प्रसंग येणे साहजिक आहे. मात्र जीवनाच्या ऐन तारुण्याचा टप्पा गाठण्यापर्यंत अडचणीच्या प्रसंगांची अक्षरशा माळ आपल्यापुढे वाढवून ठेवणे आणि त्या अडचणी जगणे किती अवघड असेल हे या उदाहरणातून कळते.
जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील जीवन हटेसिंग सिसोदे हा एक तरुण. नेहमीप्रमाणेच पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.आई आणि वडील दोन्ही अशिक्षित म्हणजे दोघांना आजही स्वतःची सही करता येत नाही. या घरात जीवन हा शेंडेफळ. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेत असताना आई-वडिलांसोबत मोल मजुरीची कामं केली. आश्रमशाळेत १०वी पर्यंत शिक्षण घेतले .दहावीला फर्स्ट क्लास मिळाला. आता अकरावी आणि बारावीची वेळ, शिक्षणासाठी घरून पैसा मिळेल याची अजिबात खात्री नसल्यामुळे जीवन ने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या गावाहून बेकरी वरून पाव घ्यायचे आणि हे पाव गावामध्ये सकाळ-संध्याकाळ विकायचे. “ताजा पाव वाले, ताजा पाव वाले “अशा आरोळ्या मारीत खाकी रंगाचा एक खोका आपल्या खांद्यावर घेत, एक हात खोक्याला आणि दुसरा हात स्वप्नांच्या दिशेने असा जीवनचा प्रवास सुरू राहिला.
बारावीला 73.80% मिळाले. डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे जीवनला डीएड साठी थेपडे अध्यापक विद्यालय म्हसावद येथे प्रवेश मिळाला. स्वतःच्या घरापासून दूर राहून शिक्षण घेणे अवघड असते म्हणून जीवन ने म्हसावद येथे एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी स्वीकारली. दिवसभर शिक्षक व्हायचं आणि संध्याकाळी वेटर व्हायचं किती विरोधाभास आहे ना ? ज्याला इतरांच्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षक व्हायचे आहे त्याला स्वतःच्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होते मात्र जीवन खचला नाही. हॉटेलमध्ये पडेल ते काम केले.लोकांच्या ऑर्डर स्वीकारल्या, टेबल खुर्चीला फडका मारला, भांडी घासले आणि डीएड चे शिक्षण पूर्ण केले.डीएड पूर्ण झाले होते. मात्र लगेच नोकरी मिळणे शक्य नव्हतं. यानंतर जीवन ने पुढील शिक्षणासाठी जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात आर्ट साठी प्रवेश घेतला. बीएची पदवी मिळेपर्यंत जीवन याने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय आणि कंपाउंडर चे काम केले. वेळ मिळेल तेव्हा खाजगी शिकवण्या घेणे सुरू होते. एम.ए राज्यशास्त्र साठी शिक्षण घेत असताना जीवन खाजगी शिकवण्या घेणे हे काम करत राहिला. शहरातील इतर संघर्ष करणाऱ्या मुलांमध्ये जीवन देखील संघर्ष करत होता. यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांचा गोतावळा जमला आणि संघर्ष करणाऱ्या मित्रांना एकमेकांची साथ मिळाली. जीवनचे मित्र व मार्गदर्शक भरत नन्नवरे जे आता मंडळ अधिकारी आहेत यांनी जीवनच्या पुढील शिक्षणासाठी मोठे सहकार्य केले. जीवन त्यांच्याबद्दल आत्मीयतेने कृतज्ञता व्यक्त करतो. परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी जीवन च्या या खडतर प्रवासात मौलिक साथ दिली. नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले तसेच वेळोवेळी मदत केली .2015 मध्ये जीवन ने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली मात्र नोकरी मिळाली नाही. 2017 मध्ये पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जीवन उत्तीर्ण झाला परंतु त्यावेळची भरती प्रक्रिया न्यायालयीन चौकटीत अडकली. 2019 मध्ये जीवनने सेट परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र नोकरी पासून जीवनचा संघर्ष सुरूच होता. या संघर्षामध्ये स्पर्धा परीक्षांच्या वाऱ्या देखील सुरू होत्या अभ्यास सुरू होता. दुःखाची घडी सुद्धा जीवनात सुरूच होती. शेतात मजुरी करणाऱ्या आई-वडिलांना जीवनच्या प्रवासाकडे बघून धीर खचायला लागलेला होता. जवळपास एक दशक डीएड होऊन झाल्यानंतर सुद्धा मुलाला नोकरी नाही तर वाईट वाटणारच हे सहाजिकच. 2021 मध्ये जीवनने नूतन मराठा महाविद्यालयात तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. या काळात जीवनचे व्यक्तिमत्व विकसित झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर स्टाफने जीवनला साथ दिली.
घनघोर अंधारानंतर आशेचा किरण उदयाला येतो आणि जीवनाचा सूर्योदय होतो हे नक्की. नुकत्याच संपन्न झालेल्या शासनाच्या पवित्र पोर्टल प्रक्रियेद्वारे जीवन सिसोदे या धडपडणाऱ्या तरुणाला सार्वजनिक विद्यालय अडावद या ठिकाणी माध्यमिक शिक्षकाची नोकरी मिळाली .आणि जीवनच्या अंधकारमय प्रवासाच्या वाटेवर सूर्य उगवला. खरं बघायला गेलं तर जीवन ने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत, मेहनतीने हा सूर्य अक्षरशा आपल्या कष्टकरी मायबापांच्या अंगणात उगवायला भाग पाडला. जीवनच्या या प्रवासात त्याचा मित्र आणि शिक्षक म्हणून खारीचा वाटा उचलता आला याचा नेहमीच आनंद राहील. शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतर कधी एकेकाळी केलेल्या अल्पशा मदतीची जाणीव म्हणून व मार्गदर्शनाचे फलित की आज जीवन स्वतः नोबेल फाउंडेशन ला भेटायला आला. मला भरून आले. आज जीवनला डॉ.अब्दुल कलाम यांनी लिहिलेले अग्निपंख हे पुस्तक भेट देताना खूप आनंद झाला. जीवन सारख्या हजारो तरुणांना आपल्या मनातील अग्नीपंख लावून यशाचा सूर्य आपल्या मायबापांच्या अंगणात उगवायचा आहे. जीवन चा हा प्रवास तरुणांना नक्कीच प्रेरणा देत राहील म्हणूनच मी म्हणतो ” जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्ष हेच जीवन ….”