• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे के. जे. सोमय्या माध्यमिक विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Nov 29, 2024

Loading

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे के. जे. सोमय्या माध्यमिक विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी
कार्यशाळेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आदिवासी समाजातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. के. जे. सोमय्या माध्यमिक विद्यालय, नरेशवाडी, डहाणू या शाळेच्या आवारात ही कार्यशाळा पार पडली. एकूण ९४ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

भांडुप येथील श्री. रवी धर्मा यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले. श्री. रवी धर्मा हे गेली अनेक दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून एसएससी बोर्डाचे माजी नियामक राहिले आहेत. सदर कार्यशाळेमध्ये एसएससी परीक्षेची पूर्वतयारी, वेळेचे नियोजन, तणावाचे व्यवस्थापन, उत्तरे लक्षात ठेवण्याची प्रभावी तंत्रे, नियोजनबद्ध उत्तरांची मांडणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागून ते परीक्षेसाठी सुसज्ज झाले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषादेखील घेण्यात आली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संसाधने उपलब्ध व्हावीत या हेतूने टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे बोर्ड परीक्षेसाठीच्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

कार्यशाळेचे संचालक श्री. रवी धर्मा म्हणाले की, “कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांचे उत्साही चेहरे पाहणे खूप समाधानकारक होते. त्यांच्यात कमालीची ऊर्जा दिसून आली. या उर्जेला यशाच्या दिशेने झेप घेण्यासाठी योग्य संसाधनांचा पुरवठा करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान त्यांच्या उत्साहाचे साक्षीदार होणे खरंच एक आनंददायी क्षण होता. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट नसून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी करणे यासाठी आमचा प्रयत्न होता.”

या कार्यशाळेत परीक्षेचे नियम, वक्तशीरपणा, आणि कमाल गुण मिळवण्यासाठी अधिकाधिक प्रश्न सोडवणे यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या. या कार्यशाळेमुळे परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.

टार्गेट पब्लिकेशन्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना के जे सोमैय्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज वनमाळी म्हणाले, “या कार्यशाळेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढीस लागला आहे. श्री. रवी सरांची शिकवण्याची पद्धत खूपच आकर्षक आणि प्रभावी आहे. टार्गेट पब्लिकेशन्सच्या मोफत पुस्तक वाटपामुळे आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी तयारीच्या दृष्टीने मोठा आधार मिळाला. टार्गेट पब्लिकेशन्सचे हे प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत. तसेच यापुढेही त्यांच्या सहयोगातून आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल, अशी आम्ही आशा करतो.”

टार्गेट पब्लिकेशन्सचे कार्यकारी संचालक श्री. तुषार चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठळकपणे मांडला. ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचा विकास व्हावा यासाठी टार्गेट पब्लिकेशन्स सतत प्रयत्नशील आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे आणि विद्यार्थ्यांच्या यशात आम्ही योगदान देऊ शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा अमूल्य मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही के. जे. सोमय्या ट्रस्टचे आभारी आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *