1 फेब्रुवारी 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे लक्षणिक धरणे आंदोलन
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची माहिती
अमळनेर प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती शासनाने गेली अनेक वर्ष मानधन वाढ केलेली नाही.
महागाई प्रचंड वाढलेली असून मध्यवर्ती शासनाकडून अंगणवाडी सेवकांना 4500/- रूपये आणि मदतनिसांना 2250/- रूपये मिनी अंगणवाडी सेविकांना 3250/- रूपये असे अत्यल्प मानधन दिले जाते सदर मानधनात उदरनिर्वाह करणे अशक्य होत आहे म्हणून महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ देण्यात यावी.
तसेच देशात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची रजा तसेच एक महिना उन्हाळी सुट्टी घेण्यात यावी.
मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी व अन्य भत्ते लागू करण्यात यावे.
मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्यात यावी.
सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 6000/- रूपये पेन्शन लागू करण्यात यावी.
वरील प्रलंबित मागण्या केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर कराव्यात.यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक 01फेब्रुवारी 2025 रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे लक्षणीक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
सदर धरणे आंदोलनात राज्यभरातून सुमारे शंभर अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.