• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

! महिला दिन विशेष !! निराधार, असहाय्य, दीन-दुबळ्यांची सेवा हीच ‘ईश्वराची पूजा’ मानणारी आधुनिक सावित्री सौ. पूजा पंडित !

Mar 7, 2025

Loading

!! महिला दिन विशेष !!

निराधार, असहाय्य, दीन-दुबळ्यांची सेवा हीच
‘ईश्वराची पूजा’ मानणारी आधुनिक सावित्री सौ. पूजा पंडित !

*पुजा पंडित जटवाडा रोड गावंदरी तांडा येथे आपल्या माणुसकी वृध्द सेवालय येथे रोडवर सापडलेल्या मनोरुग्णाना सांभाळते*

असं म्हंटले जाते, की ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्री उभी असते,’ त्याचप्रमाणे असेही म्हणणे योग्य ठरते, की एखाद्या स्रीला तिचे वडील किंवा पती यांनी तिच्या कार्यात खंबीरपणे भक्कम पाठिंबा दिला तर तीही समाजासाठी आपले भरीव योगदान देऊ शकते.’ या विधानाच्या सत्यतेसाठी महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे उदाहरण साक्षी आहे. असेच एक ‘आधुनिक ज्योती-सावित्री’ म्हणून मराठवाड्यात ‘निराधार, असहाय्य, दीन-दुबळ्यां’ची विविध प्रकारे सेवा करणारे दाम्पत्य म्हणजे ‘श्री सुमित व सौ. पूजा पंडित’ हे समाजसेवी दाम्पत्य. दोघेही समाजसेवेच्या कार्यात एकमेकाला समर्थपणे साथ देतात म्हणण्यापेक्षा एकमेकांचा हात धरुन कार्य करतात. मराठवाड्यातील गरजवंतासाठी हे ‘पंडित दाम्पत्य’ आधार बनले आहे.
सौ. पूजा पूर्वाश्रमीच्या पूजा ढवळे. जाफ्राबाद येथील श्री शाम ढवळे यांची एकुलती एक कन्या. दि.१३ फेब्रु. २०१३ रोजी श्री सुमित पंडित यांचेशी विवाहबद्ध होऊन ‘सौ. पूजा पंडित’ बनली. तीन भावांचे एकत्रित कुटुंब. कुटुंबाचा पारंपरीक ‘केश कर्तनाचा’ व्यवसाय. दररोज कमवून कष्टाचे खाणारे सामान्य कुटुंब, मात्र थोड्याच दिवसात पतीराजाचे असामान्य कार्य तिच्या लक्षात आले. नवीन विवाहीत दाम्पत्य, भविष्यातील आनंदी व सुखी संसाराची गुलाबी स्वप्ने पाहणारी पूजा. पतीचे ‘दिनरात आम्हा, समाजसेवेचे व्रत’ कार्य पाहून आपल्या स्वप्नांना मुरड घालून स्वत:च्या संसाराबरोबरच, समाजातील गरजवंताच्या संसारात सहाय्य करण्याचा निर्धार करते. सुरुवातीला रुग्ण, निराधार यांना मदत करतेवेळी समाजाकडून आर्थिक मदत मिळत नव्हती अशा आर्थिक अडचणीच्या वेळी या माऊलीने आपले दागिने विकून पतीच्या समाजसेवा कार्याला हातभार लावला.

 

 

 

 

 

 

जटवाडा रस्ताछ.संभाजीनगर येथे ‘माणुसकी समुहाच्या’ माध्यमातून नारी प्रतिष्ठा,बेटी बचाव – बेटी पढाव, निराधार मनोरुग्णांचे व रोडवरील बेवारस अवस्थेत सापडलेल्या निराधारांचा वृद्ध सेवालय येथे पुनर्वसन, शासकीय रुग्णालयात गोरगरीब गरजुंना रक्त व मेडिकल साहित्य देत रुग्ण सेवा सुश्रुषा,बेवारसांचे अंत्यविधीसाठी मदतकार्य, भारतीय सैनिकांचा सन्मान, बेटी बचाव मोहिमचे पालकत्व,
पर्यावरण संवर्धन इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणाऱ्या पती सुमितच्या सेवाकार्यात पूजा समर्थपणे साथ देते. आपल्या लेकीच्या वाढदिवशी गरीब मुलांना मिष्टान्न दान व शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजवंत मुलींना शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा उपक्रम राबवतात. एखाद्या गरजवंत रुग्णाला रुग्णालयातील प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुमित जेव्हा मदत करत असतो त्याच वेळी तो रुग्ण व त्यांचा एका नातेवाईकांच्या जेवणाची सुविधा करण्यासाठी
सौ.पूजा स्वयंपाक करून ते गरजू लोकांना पुरवत असते. रुग्ण कितीही असो व वेळ कोणतीही असो, सौ. पूजा त्यांच्या सेवेसाठी सदैव तयार असते. गरजवंताची सेवा करताना ही माऊली अजिबात थकत नाही. ‘घाटी हॉस्पीटल, औरंगाबाद’ मध्ये रुग्णांसाठी दररोज १५-२० जेवणाचे डबे पुरवणे हा तिचा नित्यक्रम झाला आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात
श्री व सौ. पंडित दाम्पत्याचे समाजकार्य अधिक अधोरेखित झाले. देशातील सर्व व्यवहार, कार्यालये, उद्योग थांबले. अनेकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत परप्रांतातील मजुरांनी ‘गड्या ! आपला गाव बरा !’ म्हणून वाहतुकीची सर्व साधने बंद असताना आपल्या कच्चे-बच्चेंसह अनवाणी पायाने उन्हातान्हात अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत प्रवास करतानाचे त्यांचे हाल व दुःख पाहून सौ. पूजाचे मन कळवळले आणि तिने आपले पती व समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी ‘मदत शिबीर’ सुरु केले.पाणी, जेवण, चप्पल, अत्यावश्यक औषधे, लहान मुलांसाठी दूध, बिस्किटे, उन्हापासून बचावासाठी संरक्षक कपडे तसेच तातडीची मदत म्हणून प्रत्येकी रु. १००/- या मजुरांना दिले. अशा प्रकारे ‘माणुसकी ग्रुप’च्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळात रु. १,१०,८००/- तातडीची मदत व रु. ८६,०००/- ची अत्यावश्यक औषधे व १० क्विंटल धान्याचे अन्न शिजवून प्रवाशी मजुरांना खाऊ घालून त्यांचा परतीचा प्रवास सुसह्य करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला.
एवढेच नव्हे तर स्वतःचे घर असतांना सौ. पुजा संभाजीनगर पासून ९ ते १० किलोमीटर दूर ओसाड माळरानावरील उभारलेल्या माणुसकी वृद्ध सेवालय येथे २४×७ सेवेत असतात, माणुसकी वृद्ध सेवालयात आतापर्यंत रोडवरील बेवारसांचे नातेवाईक शोधून २९ वृद्धानां त्यांच्या घरी पाठवले आहे. एक वेळ अशी आली होती की त्यांच्या वृद्ध सेवालयात किराणा साहित्य संपले त्यांनी वृद्धांची उपासमार होऊ नेय म्हणून त्यांनी सोभाग्याचे लेणे वयाच्या सविसाव्या वर्षी मोडले व किराणा साहित्य उपलब्ध केले.
सौ. पूजाच्या समाजसेवी कार्याची महाराष्ट्रातील अनेक समाजसेवी संस्थांनी दखल घेऊन त्यांना भूमिकन्या पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार, राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवा पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अशा विविध ३४ पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. मिळालेल्या ‘पुरस्कारामुळे करत असलेले कार्य करण्यास अधिक ऊर्जा व बळ मिळते,’ असे सौ. पूजा सांगतात. हे समाज कार्य करताना श्री.व सौ. सुमित व पूजा यांच्या मनी आपल्या निहित वयात आपले शिक्षण अपूर्ण असल्याची खंत मनात होती, म्हणून सौ. पूजा व श्री. सुमित यांनी आपल्या पतीसह ‘बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कला शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प केला व नुकतेच ते पूर्णदेखील केले. हे तिने उचललेले पाऊल समस्त समाजातील शिक्षण अपूर्ण असणाऱ्या तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed