
अमळनेरमध्ये रेशन घोटाळ्याचा भांडाफोड: सरपंचावर कारवाईची मागणी
अमळनेरमध्ये रेशन घोटाळ्याचा भांडाफोड: सरपंचावर कारवाईची मागणी
अमळनेर प्रतिनिधी:
सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे हे बोगस सेवाभावी संस्थांच्या नावे रेशन दुकान चालवून शासनाचा निधी हडप केल्याच्या आरोपात सापडले आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली असून, योग्य ती कारवाई न झाल्यास १ मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश अर्जून पाटील यांनी दिला आहे.
अमळनेर तालुक्यात रेशन माल उचलून शासनाची फसवणुक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर, पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत, दोन संस्थांची मान्यता रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ आणि निर्मलाई फाउंडेशनच्या मान्यता रद्द झाल्या असून, यामध्ये रिद्धी सिद्धी महिला बचत गटाचा देखील समावेश आहे.
याशिवाय, अद्यापही त्या बंद संस्थांच्या नावाने रेशन दुकान चालू आहेत, ज्यामुळे लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप आहे. सुरेश पाटील यांनी या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष याकडे लागले आहे.