अमळनेर आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे
माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने केली निवड
अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांचे प्रतिनिधी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा सैनिकी अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील व माजी केंद्रीय मंत्री तथा नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने ही निवड केली आहे.
लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांनी सैन्य दलात उच्च अधिकारी म्हणून 26 वर्ष सेवा दिली आहे. त्यांनी जवान म्हणून 1990 मध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे प्रशिक्षण केले. 15 मराठा लाईट इन्फंट्री (बुर्ज बटालियन) मध्ये 6 वर्ष सेवा केली. 1997 मध्ये लेखी व ‘एसएसबी’ झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी त्या ठिकाणी ‘सीएसएम’ पद भूषवले. 2 नागा रेजिमेंट (मशकोह) मध्ये सेवा दिली. कंपनी कमांडर, युनिट एडज्युटेंट, युनिट क्वार्टर मास्टर, स्टाफ ऑफिसर तसेच कुमाऊ आणि नागा रेजिमेंटल सेंटरमध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून काम केले. ऑपरेशन राइनो, ऑपरेशन हिफाजत, ऑपरेशन आर्किड, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम यासह ऑपरेशन विजय नंतर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कारगिल युद्धात शत्रू कडून रिकॅप्चर केलेल्या पोस्टचे एक वर्षापर्यंत रक्षण केले होते. श्री. थोपटे हे चित्रपट कथा लेखक असून त्यांचा 17 जानेवारी 2025 ला ‘संगी’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावर्षी पुन्हा त्यांचे दोन चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. या सर्व विशेष बाबींची दखल घेत माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या आदेशान्वये श्री थोपटे यांची आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी श्री. थोपटे यांच्याकडे पदभार दिला. नूतन कमांडंट श्री थोपटे यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले की, जिल्ह्यात एकमेव असलेली सैनिकी शाळेच्या माध्यमातून सैन्य दलात अधिकारी व लष्कर जवान घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर एनडीए, ‘एसएसबी’ची चांगली तयारी करून घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर निश्चितच शाळेसह संस्थेचा नावलौकिक वाढेल. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी राजू पाटील, प्राचार्य व्ही जी बोरसे यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांची कमांडंट पदी निवड झाल्याबद्दल शिवशाही फाउंडेशन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे यांच्या हस्ते श्री. थोपटे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे उपस्थित होते.