*दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार*
*”महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन*
*आरोग्य, आत्मनिर्भरता, सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा*
अहिल्यानगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दुर्गाशक्ती महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक महिला पदाधिकारी, लाडक्या बहिणी, शिवसेनेच्या कार्यकर्त्या आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी महिलांना आरोग्य, स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि कौशल्यविकास यावर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी म्हटले की, “आपण स्वतः चांगले दिसण्यासाठी दुसरा वाईट दिसला पाहिजे याची आवश्यकता नाही. आपण निरोगी, सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण असले पाहिजे.” हे त्यांचे वाक्य महिलांच्या आत्मभानाचे प्रतिबिंब ठरले.
महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या निधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती दिली. घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना लाभ देण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने शिबिरे आयोजित करण्याची तयारी दर्शवली. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा महिलांना घरमालकाकडून प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांच्या आरोग्यासाठी मोफत रक्त तपासणी व कॅल्शियम तपासणीचे शिबिर २५ मेनंतर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राबवले जाणार असून, प्रत्येक महिला कार्यकर्तीने आपल्या विभागातील महिलांची नोंदणी करावी, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सरकारी दाखल्यांसाठी महसूल शिबिराचे आयोजन करून त्यातून मोफत सेवा देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
घर उद्योग व बचत गटांच्या महिलांसाठी मुंबई, ठाणे येथे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही योजना आखली जाणार आहे. हे उत्पादन कसे पोहोचवायचे, कोणत्या प्रकारचे व्यवसाय निवडायचे, यावर प्रशिक्षण देण्यासाठी सरकारतर्फे मदत मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रशिक्षण, योजनांची माहिती, आरोग्य व आर्थिक स्वावलंबन या बाबींवर भर द्यावे असे त्यानी सांगितले.
या कार्यक्रमास डॉ. शबनम इनामदार (शिवसेना जिल्हाप्रमुख, अहिल्यानगर), उज्वला भोपळे (जनसंपर्क प्रमुख, शिवसेना), मीरा शिंदे (जिल्हा संघटक), सविता जंजिरे पाटील, सुनिता मोरे (संपर्कप्रमुख सांगली) आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात महिला सन्मानासोबतच आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, घरकामगारांसाठी योजना, बचत गटांचे उत्पादन व बाजारपेठ या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन झाले.