**अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रम**
अमळनेर — महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि अमळनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मंगळग्रह संस्थान व गांधी रिसॉर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आज अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांची मालिका रंगली. या कार्यक्रमात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमात प्लास्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्याविषयी जनजागृती केली गेली. विद्यार्थ्यांनी श्री स्वप्नील बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या पथनाट्यात पर्यावरणाचे रक्षण कसे करावे यावर भर दिला गेला. यानंतर मराठी नाटिका देखील सादर करण्यात आली आणि उपस्थितांना पर्यावरणाची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार, कृषिभूषण श्री साहेबराव पाटील, माजी जिल्हाप्रमुख जयश्रीताई पाटील, प्रांत श्री मुंडावरे साहेब, डीवाय एसपी विनायक कोते, पीआय निकम, नगरपरिषदेचे सीईओ तुषार नेरकर आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जिल्हा अधिकारी श्री करणसिंग राजपूत उपस्थित होते.
मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एम. पाटील, सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाचा सहभाग घेतला. मंदिरातील भक्तांस कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
अमळनेर नगरपालिकेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था व कंपन्यांच्या प्रतिनिधी हेदेखील उपस्थित होते. या उपक्रमांमुळे स्थानिक समाजात पर्यावरण बचावाविषयी जागरूकता वाढण्यास मोठा हातभार लागला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागींचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.