घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करा.–जळगांव जुक्टो संघटनेची मागणी.
जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यात बऱ्याच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे २०१२पासून शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त आहेत, अशा वेळी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता संबंधित शिक्षण संस्थांनी प्रशिक्षित अर्हताधारक शिक्षकांची शासन नियमानुसार घड्याळी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केलेली आहे. सदर शिक्षकांना शासन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मानधन अदा करीत असते.
मात्र जळगांव जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कार्यरत असलेल्या जवळपास २० शिक्षकांचे मानधन जे की अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात आहे,ते शिक्षणआयुक्त स्तरावरून अद्यापही मंजूर न झाल्याने संबंधित शिक्षकांना अदा झालेले नाही.या संदर्भात जिल्हा संघटनेने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शासन दरबारी वारंवार प्रयत्न केले. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न मांडून सुद्धा ही समस्या आजतागायत सुटलेलीनाही. सदर समस्या लवकरात लवकर न सुटल्यास संघटना आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. शासनास ह्या शिक्षकांचा विसर पडला की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या महागाईच्या काळात ज्या थोड्या बहुत रकमेचा काहीसा आधार संबंधित शिक्षकांना झाला असता,तो देखील मिळणे दुरापास्त झालेले आहे. या मागणीकडे सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात शिक्षक व पदवीधर आमदारांनी विशेष बाब म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे मागणी करावी व सदर रक्कम संबंधित शिक्षकांना त्वरित द्यावी अशी आग्रही विनंती जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने प्रा.नंदन वळिंकार (अध्यक्ष) प्रा.सुनील सोनार (सचिव) प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील(जेष्ठ मार्गदर्शक), डॉ.अतुल इंगळे,प्रा.राजेंद्र तायडे (उपाध्यक्ष), प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष) यांनी पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार श्री.किरण सरनाईक, श्री.विक्रम काळे,श्री.जयंत आसगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.