वेदना शिक्षकांच्या: पिढ्या घडवणाऱ्या खऱ्या शिक्षणसेवकांची उपेक्षित कहाणी
✍🏻 प्रकाश पाटील, यशपंढरी इंग्लिश क्लासेस, अमळनेर
📞 ९६६५१५७१५९
प्रास्ताविक
गुरुजींचे गुरुजी – साने गुरुजी. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मी अकरावी वर्गात प्रवेश घेतला, तेव्हा मनात ठाम निश्चय केला की, या थोर शिक्षकांप्रमाणेच आदर्श शिक्षक व्हायचं! त्यांच्या तत्त्वांचा वारसा घ्यायचा.
शिकवणारे शिक्षक तळमळीने आम्हाला घडवत होते. त्यांच्या शिकवण्यामधून केवळ अभ्यास नव्हे तर जीवनाचं सार मिळत होतं. वर्ग हे मंदिर वाटायचं आणि ते शिक्षक – गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु – आमच्या मनाला नवसंजीवनी देणारे असायचे.
परंतु शिक्षणाचा पुढील टप्पा – वरिष्ठ महाविद्यालय गाठताच, शिक्षकांच्या मूक वेदनांचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहिला. शंभर रुपयांच्या दैनंदिन तासिकेवर शिकवणारे, ४–६ हजारांमध्ये कुटुंब चालवणारे शिक्षक – हृदयाला चिरा पाडणारे वास्तव!१. शिक्षक… पण नावापुरता!
कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, सी.एच.बी., तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ वर्गात शिकवण्याचं काम दिलं जातं. परंतु त्यांची ओळख, अधिकार, आणि मान मात्र ‘नॉन ग्रँट’ म्हणून समाज नाकारतो.
एकाच महाविद्यालयात दोन शिक्षक – एक कायमस्वरूपी, दुसरा तासिकेवर. शिकवण सारखी, पण वेतनात जमीन-अस्मानचा फरक!
नाही आहे सामाजिक ओळख, नाही आहे आर्थिक स्थैर्य.
नाही आहे संघटनांचा पाठिंबा, नाही आहे संस्थाचालकांकडून आदर.
या शिक्षकांच्या वेदना समाजाला दिसत नाहीत. कारण हे शिक्षक “विनाअनुदानित” असतात – आणि तेच त्यांचं मोठं पाप मानलं जातं.
—
२. विद्यार्थी, पालक, आणि व्यवस्थेची अनास्था
विद्यार्थ्यांना सतत सांगितलं जातं – “प्रॅक्टिकल त्यांच्याकडून नको”, “पेपर ते चेक करणार नाहीत”, “त्यांना तो अधिकार नाही”. आणि म्हणूनच विद्यार्थी त्यांना कमी लेखतात.
पालक देखील या शिक्षकांना सन्मानाने पाहत नाहीत.
काही शिक्षक तर इतके दुर्लक्षित होतात की, विद्यार्थ्यांच्या अपमानालाही काहीच उत्तर देत नाहीत.
हे शिक्षक विद्यार्थ्यांना जीवापाड शिकवतात, परंतु त्यांचं “शिकवणं” म्हणजे केवळ “कामगारगिरी” ठरवलं जातं. त्यांचा अनुभव, ज्ञान, समर्पण – कोणालाच दिसत नाही.
—
३. वैयक्तिक आयुष्याचं वणव्यात रूपांतर
या तात्पुरत्या शिक्षकांच्या जीवनात आणखी एक गंभीर वेदना आहे – वैयक्तिक आयुष्याची अस्थिरता.
कोणीही मुलगी या शिक्षकांशी लग्न करण्यास तयार नाही.
“त्याच्याकडे नोकरी शाश्वत नाही”, “पगार काय आहे?” – या प्रश्नांवर त्यांचा त्याग, संघर्ष, विचार कुठेही टिकत नाही.
आजची स्त्री देखील त्यांच्यासाठी बोथट झाली आहे, का? हा मोठा प्रश्न आहे.
त्यांच्या आयुष्यात “सावित्रीबाई” का येत नाही?
हे शिक्षक ज्या तळमळीने समाजासाठी झिजतात, त्यांच्यासाठी समाज, आणि विशेषतः विवाहासाठी निवड करताना स्त्रीवर्ग, इतका संवेदनाशून्य का झाला आहे?
—
४. शासकीय भरती प्रक्रियांची विसंगती
‘पवित्र पोर्टल’सारख्या शासकीय भरती प्रक्रियेमुळे या शिक्षकांचा अजून छळ होतोय.
ज्या शिक्षकांची एकदा निवड झाली, त्यांनाच पुन्हा फेज-2 मध्ये संधी दिली जाते.
नव्या, मेहनती, पण गरीब शिक्षकांना वेटिंग लिस्टवर ठेवून दुर्लक्षित केलं जातं.
या व्यवस्थेमुळे शिक्षक होण्याचं स्वप्न… स्वप्नच राहून जातं. आणि शिक्षण ही एक केवळ पैसेवाल्यांची मालकी बनते.
—
५. मार्ग काय? आणि जबाबदारी कोणाची?
शिक्षणाचा खरा आत्मा हे शिक्षकच आहेत. मग ते सीएचबी असोत, तासिकेवर असोत की कायमस्वरूपी.
पालकांनी आणि समाजाने जर त्यांना पाठिंबा दिला तर:
आपल्या पाल्याला कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळेल.
शिक्षकांचा आत्मसन्मान वाढेल.
आणि शिक्षण व्यवसाय न राहता सेवा क्षेत्र ठरेल.
—
६. शेवटचा सवाल – शिक्षक हा फक्त पगारासाठी का असावा?
तो ज्ञानदानाचा वाहक आहे. त्याने पिढ्या घडवल्यात, समाज घडवलाय. पण तोच समाज आज त्याच्या वेदनेला उत्तर देत नाही.
> “जो शिक्षक स्वतः वेदना अनुभवतो, तोच दुसऱ्याला समजून शिकवू शकतो.”
—
💬 निष्कर्ष आणि आवाहन:
शिक्षक हे केवळ शाळेतील एक व्यक्ती नाही, तो विद्यार्थ्याच्या आयुष्यातील दीपस्तंभ आहे. त्याच्या वेदनांकडे डोळेझाक करणं म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं करणं.
✅ शिक्षकांच्या वेदनेला समजून घ्या.
✅ त्यांना मान-सन्मान द्या.
✅ त्यांच्याबरोबर शिक्षणव्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.—
> “शिक्षकांच्या वेदना केवळ त्यांच्याच नाहीत, त्या पूर्ण समाजाच्या असतात. कारण शिक्षक घडवतो माणूस, आणि माणूस घडवतो देश.”
लेखक
✍🏻
प्रकाश पाटील
यशपंढरी इंग्लिश क्लासेस, अमळनेर
📞 ९६६५१५७१५९
—