“आपुलकी, आनंद आणि गोडवा – मनस्वीचा वाढदिवस झाला खास!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे आज दिनांक ११ जुलै २०२५, शुक्रवार रोजी एक अत्यंत भावनिक आणि आनंददायी क्षण साजरा करण्यात आला.
श्री. हरीओम चिंधू बिऱ्हाडे आणि सौ. जयश्री हरीओम बिऱ्हाडे यांची लाडकी कन्या कु. मनस्वी हिचा पहिला वाढदिवस शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या खास प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर उपस्थित होते. त्यांनी कु. मनस्वीला प्रेमळ शुभेच्छा देत आशीर्वाद दिला व तिचे जीवन यशस्वी व सुंदर होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी व इतर उपस्थित मान्यवरांनीही कु. मनस्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन (गोडधोड) देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान हे कार्यक्रमाच्या यशाचे जणू द्योतक ठरले.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शुभम पवार यांचेही यथोचित स्वागत करण्यात आले. बिऱ्हाडे कुटुंबियांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आपला आनंद शेअर करत दिलखुलास सहभाग दिला. या उपक्रमातून सामाजिक भान जपण्याचा एक सकारात्मक संदेश सर्वत्र पसरला.
हा उपक्रम सामाजिक समरसतेचे आणि मानवतेचे उत्तम उदाहरण ठरला.
परिश्रम दिव्यांग निवासी शाळेच्या वतीने बिऱ्हाडे परिवाराचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.