“रस्त्यावर मोकाट जनावरांचे तांडव – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहराच्या रस्त्यांवर सध्या एक गंभीर समस्या उभी राहिली आहे – मोकाट जनावरांची. सकाळी शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, तसेच वृद्ध नागरिक यांना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात पाहिलं तरी रस्त्यावर बसलेल्या किंवा फिरणाऱ्या जनावरांचा हैदोस दिसतो.
या जनावरांमुळे अपघात घडण्याच्या घटना वाढत असून, काही वयोवृद्ध नागरिक गंभीर जखमीही झाले आहेत. अशा वेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं – पण प्रशासकीय दुर्लक्ष मात्र तसंच आहे.
📣 नागरिकांची प्रतिक्रिया:
“पटवारी कॉलनी, विद्या विहार कॉलनी, सुरभी कॉलनीमध्ये सध्या मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे. रस्त्यांमध्ये ही जनावरे बसल्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर चालकाला गाडी चालवणे कठीण होते. कधी कधी गाडीवर बसलेल्या व्यक्तीला ही मोकाट गुरे धडकही देतात. त्यामुळे नगरपरिषदेने या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.”
— पंडित भदाणे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक
🔎 प्रशासनाचे दुर्लक्ष – संभाव्य धोका
प्रसारमाध्यमांनी यापूर्वी अनेक वेळा आवाज उठवला आहे, मात्र अमळनेर नगरपरिषदेने अद्याप ठोस पावलं उचललेली नाहीत. वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हे गंभीर संकट बनत चालले आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून, मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाय योजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.