• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिक्षक दिनाची अनोखी भेट….स्वराचं दातृत्व !

Sep 6, 2023

Loading

शिक्षक दिनाची अनोखी भेट….स्वराचं दातृत्व !

माझी विद्यार्थिनी स्वरा अनिल जोशी हिचा दोन दिवसांपूर्वी निरोप आला. “सर माझी नीट परीक्षा झालेली आहे आणि माझा बीडीएस साठी धुळे मेडिकल कॉलेजला नंबर देखील लागला पण माझे अकरावी बारावी तसेच नीट परीक्षेची सर्व पुस्तके आता पडून राहतील.मला ती निम्मे किमतीत बाजारात विकायचे नाहीत. त्यामुळे नोबेल फाउंडेशनला नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या गरजू मुलाला ही सर्व पुस्तके देता येतील का ?” खरंतर हा प्रश्न ऐकून मला भरून आले.
कारण नीट परीक्षेची एकंदरीत सर्व पुस्तके खरेदी करायला पंधरा ते वीस हजार रुपये लागतात. ग्रामीण भागातील मुलांकडे एवढे पैसे पुस्तकांसाठी कधीच नसतात. नोबेल फाउंडेशन मध्ये काही विद्यार्थी यावर्षी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून नीट परीक्षेची तयारी करीत आहेत .माझ्या डोळ्यांसमोर त्या मुलांचे चेहरे आलेत आणि मी तात्काळ स्वराच्या वडिलांना पुस्तके घेण्याचा होकार कळविला. सकाळीच मी स्वराच्या घरी पुस्तके घेण्यासाठी गेलो. स्वराचे वडील श्री अनिल जोशी सरांनी स्वराला चहा करायला सांगितला स्वराने अतिशय उत्तम चहा आम्हाला पाजला. पुस्तकांचे गठ्ठे एकामागे एक तिने हॉलमध्ये आणून ठेवले. यात रेफरन्स पुस्तके, एनसीईआरटीची पुस्तके, बोर्डाची पुस्तके, डायजेस्ट, नोट्स ,हस्तलिखित नोट्स, टेस्ट सिरीज असा सर्व नीट परीक्षेसाठी लागणारा लवाजमा होता. या पुस्तकांसोबत स्वराचा फोटो घ्यायची माझी इच्छा झाली.मी तिला म्हटलं की या पुस्तकांसोबत तुझा फोटो हवा आहे तर या चिमुकलीने दिलेले उत्तर अतिशय अंतर्मुख करायला लावणारे आहे. ती म्हणाली, “सर मी केलेली मदत खूप मोठी नाही. या छोट्याशा मदतीचा फोटो कशाला हवा फक्त एखाद्या गरजू विद्यार्थ्याला हे पुस्तके पोहोचवा सर माझ्यासाठी तोच आनंद आहे”.
स्वराचे खूप कौतुक वाटले. पण हे नक्की “शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी”. श्री अनिल जोशी सर व नीलम ताई यांच्या या दोन्ही कन्या म्हणजे सई आणि स्वरा या अतिशय गुणी व संस्कारक्षम आहेत. सई आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबॉल प्लेयर आहे.आणि स्वराचा प्रवासाचा दंत वैद्यक म्हणून सुरू झालेला आहे. स्वरा तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद !!

ता.क.- स्वराच्या या उदाहरणातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्याकडील पुस्तके रद्दी अथवा निम्मे किमतीत न विकता गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे हया तिच्या शुद्ध हेतूचा मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!.मा. जयदीप पाटील सर,अध्यक्ष नोबेल.. फौंडेशन, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *