• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

एन. के. अण्णांप्रती कृतज्ञता सोहळा म्हणजे चिरंतन मूल्यांचा ठेवा- प्रा. प्रकाश पाठक

Nov 20, 2023

Loading

एन. के. अण्णांप्रती कृतज्ञता सोहळा म्हणजे चिरंतन मूल्यांचा ठेवा- प्रा. प्रकाश पाठक

स्थितप्रज्ञ एन. के. अण्णा म्हणजे निरपेक्षता व शिस्त यांचा संगम- किशोर आप्पा पाटील

प्राचार्य एन. के. अण्णा पाटील यांच्या प्रती माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता सोहळा संपन्न

धुळे- आजचा कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षक या नात्याची गुंफण आहे. शिक्षकी पेशाची तुलना जगातील कुठल्याही विषयाशी होणार नाही. भेटावे हा आजच्या कार्यक्रमाचा गाभा आहे, आपली पाऊले गुणांचे पूजन करण्यासाठी वळली आहेत एव्हढी पुण्याई अण्णांनी मिळविली आहे. स्वाभिमानाला धक्का लागला तेव्हा पदाच्या मोहापासून दूर झाले. जेथून बाहेर पडले तेथील बरं वाईट बोलणं टाळतात, बोलतच नाही. समोरच्याला स्वातंत्र्य देत याचा अर्थ तो स्वैराचारी होणार नाही याची काळजी घेत असे फणसारखे अण्णा यांची वर्तमानासारखी दहशत नव्हती, दडपण नव्हते. पण दरारा धाक होता त्याला स्नेहाची जोड होती. अण्णांचे आयुष्य म्हणजे पिकलेल्या चिकुच्या बी-सारखे असून नि:स्वार्थ, निरपेक्ष निष्कपट आहे. हा कार्यक्रम नाते तयार करणाऱ्या चिरंतन मूल्यांचा ठेवा होय. जोखणे हेरणे, करडी नजर या गुणांवर परिस्थितीचे ओझे अंगावर घेत काम करणारे एन.के. अण्णा हे चिरंतन मूल्यांचा ठेवा सदैव शिंपत राहणारे प्रकाशमान दिपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, ‘‘असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक यांनी प्राचार्य अण्णासाहेब एन.के. पाटील यांच्या 93व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल त्यांच्या प्रती त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी काल भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे संचलित यशवंत विनयन मंदिर देवपूर, धुळे येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जीवन गौरव पुरस्कार प्रदान प्रसंगी बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कराचार्य संशोधन संस्थेचे अध्यक्ष किशोरआप्पा पाटील होते.

माजी कुलगुरु के. बी. अण्णा पाटील म्हणाले, उच्च शिक्षणात पहिली पिढी एन. के. अण्णांमुळे पुढे आली, ते माझ्या आयुष्यातील सर्व घटनांचे साक्षीदार आहेत. त्यांच्यामुळेच मी उच्च पदांपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या जीवनात एन. के. अण्णा नसते तर मी बी.एस्सी. सुद्धा होऊ शकलो नसतो. आजही अण्णांशी नुसती दहा मिनिटे भेट झाली तरी सध्याच्या बिघडलेल्या वातावरणात मनाला शांती मिळते. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांनी त्यांच्या संस्थेतर्फे अण्णांना मानपत्र प्रदान केले व केवळ अण्णांनी मार्गदर्शन केले म्हणूनच आम्ही या पदापर्यंत पोहोचलो असे सांगितले. डॉ. संजय देवरे आपल्या भाषणात म्हणाले, अण्णांच्या मार्गदर्शनामुळेच मला फिजिक्स मध्ये 99% मार्कस मिळाले व मी पहिला आलो. माझे आई-वडील गेले असले तरी त्यांच्या रुपात मी अण्णा व सुहासिनी ताईंकडे पहातो. प्रा. एस.एस. पाटील म्हणाले, एन.के. अण्णा माझे मित्र सहकारी भाऊ आहेत. त्यांच्याकडून जे शिकलो त्याचा मला आयुष्यात फायदा झाला. नियमानुसार काम करणे हे मी अण्णांकडून शिकलो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात माजी न्या. ॲड. जे.टी. देसले बापू म्हणाले, ‘‘एन. के. अण्णा यांनी चळवळ व परिवर्तनाचे धडे शिकविले. त्यामुळे आज त्यांचे विद्यार्थी अनेक पदांवर पोहोचले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना आणल्या. संतुलित व्यक्तीमत्त्व असलेले अण्णा कमी बोलणे काम जास्त करणे, हा त्यांचा प्रघात होता. आज 93व्या वर्षीही ते सकारात्मक दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. म्हणूनच माजी विद्यार्थ्यांतर्फे हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे न्या. देसले बापू यांनी नमूद केले.

प्रा. एल.जी. सोनवणे व प्रा. एन.डी. नांद्रे यांनी तयार केलेल्या मानपत्राचे वाचन केले व अध्यक्ष किशोरआप्पा पवार, प्रा. प्रकाश पाठक, के.बी. अण्णा पाटील, प्राचार्य बी.एस.दादा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एन.के. अण्णा व सुहासिनी ताई यांना प्रदान करण्यात आले. ‘वात्सल्यसिंधू’ या आई विषयी कवितांवरील संग्रहाची संपादक कवी डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांनी भूमिका विषद करतांना सांगितले की, वात्सल्य सिंधूची मुळ कल्पना प्राचार्य बी.एस.दादा पाटील यांची आहे. एका काव्यवाचन कार्यक्रमात आईवरील कविता ऐकुण बी.एस. दादांचे डोळे पाणावले., त्यांना आईची आठवण झाली. मातृहृदयाचा आविष्कार म्हणून बी.एस.दादांच्या प्रेरणेने ‘वात्सल्यसिंधू’ ची निर्मिती झाली व ती एन.के.अण्णा व सौ. सुहासिनी ताई यांना अर्पण करण्यात आली. ‘वात्सल्य सिंधू’ च्या निर्मितीसाठी प्रा. आशुतोष पाटील, प्रा. एल.जी. सोनवणे, कवी रावसाहेब कुवर यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष- किशोर आप्पा पाटील अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाले, भास्कराचार्य संस्था स्थापन करण्यात एन. के. अण्णा यांचे बहुमोल योगदान होते. ‘स्थिप्रज्ञ’ व्यक्तीमत्त्व असलेले एन.के. अण्णा म्हणजे निरपेक्षता व शिस्त यांचा संगम होय. एन.के. अण्णांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांनी आज समाजजीवनात उत्तुंग झेप घेतली आहे. कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राचार्य बी.एस. दादा पाटील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतांना म्हणाले, ‘‘आम्ही 3 वर्षापासून हा कार्यक्रम व्हावा म्हणून तयारी करीत होतो. एन. के. अण्णा परवानगी देणार नाहीत म्हणून अण्णांच्या कन्या प्रतिक्षा व मनिषा यांच्यावर अण्णांना कार्यक्रमस्थळी आणण्याची जबाबदारी सोपवून त्यांना माहित पडू न देता आम्ही कार्यक्रमाची तयारी केली. बाबुलाल जेवला का? असे माझ्या गरीबीच्या काळात विद्यार्थी दशेत मला विचारणारी सौ. सुहासिनी ताईंचे माझ्यासाठी जन्मदात्री आई एव्हढेच स्थान होते व आहे. मातृसिंधु ही त्यांचीच प्रेरणा आहे हे नमुद करीत असतांना बी.एस.दादांना गहिवरून आले. एन. के. अण्णा संबंधीच्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी आपण वर्षभरात पुस्तकरुपाचे स्वरुप देऊ असे घोषित करीत आठवणी पाठविण्याचे आवाहन केले व या कार्यक्रमासाठी राबणाऱ्या हातांचे बी.एस.दादांनी आभार मानले. एन. के. अण्णांच्या परिश्रमाने लोखंडाचे सोने झालेल्या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या शिस्तबद्ध कार्यक्रमाचे प्रा. उषाताई पाटील यांनी आपल्या विशिष्ट शैलीत केलेले सूत्रसंचलन श्रोत्यांना भावले. कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेले संदेशाचे वाचन झाले. प्रारंभी मृतात्म्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. क्रिकेटचा अंतिम सामना सुरु असतांनाही खान्देशच नव्हे तर राज्यभरातून आलेल्या अण्णांच्या माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने लक्षणीय उपस्थिती हे या वेळेवर सुरु झालेल्या व संपलेल्या शानदार कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये होते. अल्पोपहारानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


फोटो कॅप्शन- प्राचार्य एन. के. अण्णा व सौ. सुहासिनी ताई पाटील यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता सोहळा प्रसंगी मानपत्र प्रदान करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर आप्पा पाटील,
न्या. जे.टी. बापू देसले, माजी कुलगुरु के.बी. अण्णा पाटील ,
प्राचार्य बी.एस.दादा पाटील, प्रा. एस.एस. पाटील आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed