

खेळ हा आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो.:डॉ.शोभा पाटील
सम्राट अशोक विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आधुनिक युगात खेळाचे महत्व कमी होत चालले आहे परंतु खेळ आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे मोबाईल मध्ये अडकून न पडता अभ्यासाबरोबर खेळायचाही छंद जोपासला पाहिजे.असे प्रतिपादन राष्ट्रीय धावपटू डॉ. शोभा पाटील यांनी सम्राट अशोक विद्यालयात क्रीडा महोत्सव उद्घाटन समयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. शोभा पाटील तसेच कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सलग पाच दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समयी तेजस सावंत म्हणाले ज्या व्यक्तीमध्ये खिलाडू वृत्ती असते ती व्यक्ती जीवनात कधीही अपयशी होत नाही कारण खेळामध्ये यश आणि अपयशातून पुढे जाण्याची ऊर्जा निर्माण होत असते. असे प्रमुख पाहुणे कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तेजस सावंत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात व्यक्त केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.टी. धनविजय यांनी क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचा परिचय माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी करून दिला तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले.