

कल्याण येथे लेझीम कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद!
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- सेवानिवृत्त ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर यांनी २९ ते ३१ मार्च दरम्यान संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत श्री गजानन विद्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम येथे लेझीम कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी कल्याण, भिवंडी व वाशिंद येथून शाळेतील क्रीडा शिक्षक व शिक्षीका तसेच अन्य लेझीमपटू पुरुष व महिला यांनी आवडीने सहभाग घेतला आहे विशेष औत्सुक्याची बाब म्हणजे श्री. गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी आवडीने सहभाग घेतला आहे.
लेझीम कार्यशाळेत एशियाड लेझीम, दख्खनी लेझीम व बडोदा लेझीम हे प्रकार शिकवले जाणार असून विविध लेझीमच्या तालांचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. लेझीमची पारंपारिक वाद्य हलगी, घुमके, ढोल व ताशा या वाद्यांच्या विविध हातांचे प्रशिक्षण लेझीम प्रशिक्षक अंकुर आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लेझीमपटू आवडीने घेत आहेत. शाळा व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक तसेच महाविद्यालयातील एन.सी.सी. व एन.एस.एस. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल व मे महिन्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व ठाणे शहर येथे लेझीम कार्यशाळा राबविण्याचा अंकुर आहेर यांचा मानस आहे. ज्या शाळा, महाविद्यालय व गृहसंकुलात लेझीम पथके तयार करायची असतील तर त्यासाठी 8422919612 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अंकुर आहेर यांनी आवाहन केले आहे. कार्यशाळेसाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.