• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो – श्रीमती शशिकला बोरोले

May 20, 2024

Loading

वैधव्याचा दैवी आघात देतांना कर्तव्य कठोर होऊन संकटांशी लढण्याचं बळ सुद्धा परम कृपाळू परमेश्वर मातेला देतो : श्रीमती शशिकला बोरोले
जागतिक मातृदिनानिमित्त डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे आदर्श मातांचा मातृवंदना सप्ताह अंतर्गत कौटुंबिक सन्मान व सत्यशोधक समाज संघातर्फे ग्रंथदान ]
जन्म देऊन स्री निसर्गतः जन्मदात्री होते.कालानुक्रमे बाळ जन्मतःच तिच्या अमृतकुंभातून ममता व वात्सल्याचे पाझर फुटतात आणि बाळामुळे तिच्यातील ‘ आईचा ‘ जन्म होतो ! एकमेकांना जन्म देण्याचं सृजनाचं हे अद्वैत अतुलनीय आहे ! जगात आई ही एक निर्विवाद मातृदेवता आहे की जिथे कट्टर नास्तिकही मनोभावे पुजन करून तिचे आशिर्वाद घेणं व प्रदिर्घ कृपाछत्रात राहणं परमभाग्य समजतो ! जन्मदात्रीच्या भूमिकेशिवाय ‘आई बहुआयामी शक्तीशाली देवता आहे ‘ ….कुटुंबासाठी अहोरात्र त्याग,समर्पण करणारी आई ‘ संस्कारांचे कालातीत अक्षय विद्यापीठ ‘ आहे.मातृदिन म्हणजे जन्मदात्री प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा महन्मंगल पवित्र दिन.भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन सर्वत्र उत्साहात साजरा करतात.
ऐन तारुण्यात पतीचा आकस्मिक अपघात,दुर्धर आजार,घातपात,आत्महत्या यामुळे दुर्दैव्याने वैधव्य येऊन माता भगिनींचे जीवन मृतप्राय होते.शिक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही.ही बला अंगलट येईल वारंवार हात पसरेल म्हणून रक्ताचे नातेवाईक संबंध टाळतात.स्वकियांची उपेक्षा व दुर्जनांचा उपहास,वासनांध गिधाडांपासून चरित्र रक्षण करणे अशा अग्निदिव्यातून जातांना मानसिक संतुलन राखणे एकल स्त्रीची सत्वपरीक्षा असते.लघुउद्योग अथवा गृहउद्योग करून घर चालविणे.मुलांच्या निकोप जडणघडणीसाठी त्यांच्यावर संस्कार करत संगोपन,शिक्षण,लग्न करून देणे या अपरिहार्य जबाबदाऱ्या मातृत्वाची कसोटी असते.लेकरांचे भविष्य घडवितांना मातेच्या मातृत्वाची अनंत रूपे,विराट शक्ती प्रकटते.दैवी आघात,अन्याय,अत्याचाराचे हलाहल पचवून एकल माता मुलांसाठी कधी संस्कारदीप जिजाऊमाता, प्रशासक अहिल्याबाई होळकर, हक्कासाठी लढणारी रणरागिणी झाशीची राणी होते.प्रसंगी संयमी गांधारी माता,शोषित सीतामाता होते.अतुलनीय समाजकार्य करून कधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होते तर कधी अनाथांची माता सिंधुताई सपकाळ होते …..
वात्सल्य ‘ सिंधु ‘ मातोश्रीने दिली विजय लुल्हे यांना मातृदिन सार्वजनिक करण्याची अशी दिली प्रेरणा :-विजय लुल्हे संवेदनशील सेवानिवृत्त उपक्रमशील प्राथमिक शिक्षक.त्यांनी जेव्हा प्रथमतः आईला मातृदिनानिमित्त सत्काराचे प्रयोजन सांगितले की, ‘ नऊ महिने तू पोटात प्रतिपाळ केला ; मरणयातना सोसून जन्म दिला आणि हे सुंदर जग दाखवलं.लग्न झाल्यापासून सार आयुष्य कुटूंबासाठी स्वतःच्या वैयक्तिक इच्छा आकांक्षासह सानंद समर्पित केलं. स्थितप्रज्ञतेने रक्ताचं पाणी करून सिंचनाने कुटूंबात सुख – समाधानाचे नंदनवन फुलवून घराचा स्वर्ग केला.म्हणून आज मातृदिनी तुझा कृतज्ञतापूर्वक सन्मान करून शुभाशीर्वाद घ्यायचेयं ‘ हे ऐकताचं आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले… भावनावेगातून सावरल्यानंतर आईने पुजन व औक्षणासाठी एक पूर्व अट घातली.आई धार्मिक प्रवृत्तीची अन् देवभोळी.आई म्हणाली,’ जन्मदात्री म्हणून तू पुजन ,औक्षण करून आशीर्वाद घेतले पण बेटा, हा फक्त जन्म देणाऱ्या ‘ देवकी मातेचा ‘ शारीरिक सत्कार झाला.परंतू जन्म न देता माया,ममतेने जीवाची पंचारती करून संगोपन करणाऱ्या ‘ यशोदा मातेच्या ‘ वात्सल्याचा अन् विशुद्ध भावनेचा ‘ निरपेक्ष सन्मान केलास म्हणजे सर्वांर्थाने मातृदिन साजरा होईल.तू अनाथ,निराधार अन् पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलांचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण करून आईची जागा घेणाऱ्या आदर्श सद्शील मातांचा सत्कार यापुढे केल्यासच माझा आनंद परिपूर्ण होईल.’आई फक्त ४ थी शिकलेली.आई हे संस्कार व तत्वज्ञानाचे अन् नैतिकतेचे चालते बोलते विद्यापीठ असते याचा मला साक्षात्कार झाला ! आईच्या व्यापक क्रांतदर्शी,डोळस विचारांनी मी अवाक् झालो ! आईच्या संकल्पना व मार्गदर्शनानुसार मी चिंचोलीला १४ मे २००६ मध्ये अशा मातांचा शोध घेऊन मातृदिनी सन्मानित केले.जळगावला सन २०१० ला आल्यापासून पुत्रवत प्रेम करणाऱ्या सन्मित्र संजय भावसार याची आई वात्सल्यमूर्ती मातृवत् सौ.प्रमिला वनिलाल भावसार व गुरुबंधू रवि आर्ट अर्थात रविंद्र रामकृष्ण सोळुंके यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य सौ.सावित्री वहिनी यांचा दरवर्षी भावस्पर्शी सन्मान करून हक्काने आशिर्वाद घ्यायचो.मातृवत् प्रमिला भावसार यांचे कोविड काळात निधन झाल्याने माझी नंतर जाण्याची हिंमत झाली नाही….आईच्या मूल्याधिष्ठित विचारांचा मला खूप अभिमान वाटला एवढेच नव्हे तर तिच्या पोटी जन्म मिळाल्याचा पराकोटीचा परमानंद झाला.माझ्या भाग्याचा सुद्धा मलाच हेवा वाटू लागला !
मातृशक्तीच्या सन्मानार्थ मी ३ जानेवारी २०१७ पासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून आपल्या निःस्वार्थी कार्यकर्तृत्वशील शिक्षिका व समाज शिक्षिकांना ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करतो.यावर्षी माननीय पत्रकार शैलेंद्र ठाकूर,समाजसेवक पी.आर.सोनार ( माजी अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक संघ,चैतन्यनगर जळगाव ) , समाजसेवक एम.टी.लुले ( सचिव,श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ,जळगाव ), मातोश्री सिंधु सुतार यांच्या मार्गर्शनान्वये आदर्श मातांचा जागतिक मातृदिनाच्या औचित्याने ‘ मातृदिन सप्ताह ‘ दि.१२ ते १९ मे २०२४ काळात मान्यवरांच्या हस्ते प्रतिदिन निवासस्थानी जाऊन कौटुंबिक सत्कार करून साजरा केला.
जागतिक मातृदिनी केलेल्या ‘ आदर्श माता ‘ सत्काराचे स्वरूप व पद्धती
निवासस्थानी आकस्मिक जाऊन शाल व श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार सोबत दोन पुस्तकांचे ग्रंथदान :-
१ ) ‘ वात्सल्यसिंधु ‘ ( संपादित काव्यसंग्रह ) संपादन :- डॉ.नरेंद्र खैरनार,प्रकाशक – अथर्व प्रकाशन,जळगाव २ ) महात्मा जोतिबा फुले यांचे अमर जीवन : लेखक – शास्री नारो बाबाजी महाधट पाटील प्रकाशक – सत्यशोधक समाज संघ,महाराष्ट्र राज्य
मातृसन्मानाची पद्धत :-

प्रारंभी जन्मतः अधिकार प्राप्त सुपुत्र / सुपुत्री यांच्या हस्ते मातेला कुंकुम तिलक लावून सादर औक्षण करून नतमस्तक होत सत्कारार्थी मातांचे शुभाशिर्वाद घेणे.अन्य कुटुंबीयांच्या औक्षणानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते भावपूर्ण सत्कार

जागतिक मातृदिन औचित्याने सन्मानार्थी आदर्श माता व सत्कार करणारे मान्यवर
१ ) सौ.शारदाबाई शांतीलाल पवार शुभहस्ते : – पी.आर.सोनार
( माजी अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक संघ,चैतन्य नगर जळगाव )
२ ) श्रीमती उषा दिनकर जव्हरे
शुभहस्ते : विजयराव रूम
( सेवानिवृत्त अभियंता , महावितरण )
३ ) श्रीमती लिला तुकाराम साळुंके शुभहस्ते :- सुपूत्री सौ . मनिषा मधुकर रुले व जावई दिनेश रुले
४ ) सौ.अंजनाबाई नामदेव सपकाळ शुभहस्ते : – शैलेंद्र ठाकूर (कार्यकारी संपादक / दैनिक महाराष्ट्र सारथी )
५ ) श्रीमती कमल विठ्ठल ठाकुर
शुभहस्ते : विजयराव रुम
( सेवानिवृत्त,अभियंता महावितरण )
) सौ.मनिषा शैलेंद्र ठाकूर
शुभहस्ते : सुकन्या
सौ.जयश्री आणि सौ.नेहा
७ ) श्रीमती कुमुदिनी जाधव
शुभहस्ते : सुपूत्र संजय जाधव
—————————————-

सत्कार करतांना व्यक्तिनिष्ठता न आणता प्रारंभी कुटूंबातील सुपूत्र / सुकन्या यांच्यासह कुटुंबातील सदस्यांतर्फे आदर्श मातांचे अग्रपूजन व औक्षण करून घेतल्याने उपक्रमाला नकळत कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप आले ! यापुढे मातृदिनाला मातेचा सत्कार आम्ही निरंतर करु याची उत्स्फूर्त ग्वाही कुटूंबियांनी दिल्याने मातृदिन सन्मानाच्या मूल्य संस्कारांच्या प्रेरणांच्या बिजारोपणाची फलश्रुती नकळत सिद्ध झाली ! पॅथालॉजिस्ट डॉ.तुषार बोरोले , डॉ.निलिमा बोरोले,वरिष्ठ तंत्रज्ञ सौ.मनीषा रुले ,अभियंता ज्ञानेश्वर मेथाळकर ,चि. पार्थ,मनिषा रुले,दिनेश रुले,सरोज सोळुंके,सुनिल पवार सर,मंजू पवार,सानिका, सर्तेश,काकाश्री शांतिलालजी पवार,पत्रकार शैलेंद्र ठाकूर,सौ.मनिषाजी ठाकूर,प्रकाश सपकाळ, सौ. उज्जवला दिदी
,काकाश्री नामदेव सपकाळ, संजय जाधव,सौ.लता जाधव,सौ.रेखा दांडेकर,सुकन्या आश्विनी दांडेकर ,संयोजक विजय लुल्हे,मातृदिन सत्काराच्या संकल्पक तथा मार्गदर्शक मातोश्री श्रीमती सिंधु सुतार,ज्येष्ठ स्नुषा संगिता जाधव ही संबधित कुटुंबिय मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *