• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अंगणवाडी कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

Jul 13, 2024

Loading

अंगणवाडी कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

मुगंसे  ता.अमळनेर प्रतिनिधी(भानुदास पाटील)
आज रोजी मा. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कक्षात वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत स्वतः मंत्री महोदया अनुपस्थित होत्या. शासनाच्या वतीने मा प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, श्री अनुप कुमार यादव, उपसचिव श्री ठाकुर, आयसीडीएस आयुक्त श्री कैलास पगारे उपस्थित होते. कृती समितीच्या वतीने कॉ एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, शेहनाज शेख, आरमायटी इराणी, राजेश सिंग, संगीता कांबळे व अन्य दोन सेविका उपस्थित होते.

बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा करण्यात आली –
१) मागणी – सेविका, मदतनिसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी. त्यातील फरकाचे प्रमाण १०० ला ८० असा असावा.
प्रशासनाचे उत्तर – मानधनवाढीचा अजूनही प्रस्ताव तयार नाही. जुलै महिना अखेर पर्यंत प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.
२) मागणी – मासिक पेन्शन लागू करा.
प्रशासनाचे उत्तर – प्रस्ताव तयार होऊन शासनाच्या विविध विभागांकडे सादर केला आहे. वित्त विभागाकडे पाठवणे अजून बाकी आहे. सर्व प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.
३) मागणी – ग्रॅच्युइटी ताबडतोब लागू करा
प्रशासनाचे उत्तर – प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल.
४) मागणी – १० वी पास मदतनिसांची सेविका पदी थेट नियुक्ती ताबडतोब सुरू करा, कृती समिती केस मागे घेईल-
प्रशासनाचे उत्तर – ॲफिडेव्हिट तयार करून उच्च न्यायालयात दिले जाणार आहे. २ ऑगस्टला तारीख आहे. त्या दिवशी केस मागे घेतल्यावर थेट नियुक्ती सुरू करण्यात येईल.
५) मागणी – सेविकांच्या सुपरवायझर पदी भरतीसाठी वयोमर्यादा ५५ पर्यंत शिथिल करा –
प्रशासनाचे उत्तर – केंद्रीय निकष बदलण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली जाईल
६) मागणी – आजारपणाच्या रजा मंजूर करा
प्रशासनाचे उत्तर – प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे.
७) मागणी – करोना काळातील बुडलेल्या २६ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीचे मानधन देण्यात यावे
प्रशासनाचे उत्तर – त्या वर्षीचा निधी केंद्राकडे परत गेला आहे. तो मिळावा यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.
८) मागणी – आहाराच्या व इंधनाच्या दरात वाढ करा
प्रशासनाचे उत्तर – केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल
९) मागणी – महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान ४००० ते ८००० रुपये करा.
प्रशासनाचे उत्तर – प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला जाईल.
१०) लाडकी बहिण योजनेचे फॉर्म ऑफलाइन स्विकारावेत. ऑनलाईन कामासाठी कार्यालयात यंत्रणा उभी करावी
प्रशासनाचे उत्तर – पुढील आठवड्यात पोर्टल सुरू होत आहे. ज्यांना जमेल त्यांनी करावे, सक्ती केली जाणार नाही. पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन व प्रशासन गेली २ वर्षे फक्त विचार व विचारणा करत आहे. परंतु समाधानकारक मानधन वाढीसहित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रदीर्घ संप करूनही शासन हललेले नाही. आता आपल्या हातात मोजके दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मुर्दाड शासन, प्रशासनाकडून काही मिळवायचे असेल तर आंदोलन तीव्र करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. म्हणूनच या बैठकीनंतर कृती समितीच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. ही चर्चा व या आधी ऑनलाईन बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार खालील आंदोलने करण्यात येणार आहेत
💥 १५ जुलै पासून प्रकल्प व जिल्हा स्तरावर जोरदार शक्तिप्रदर्शन करून निवेदन द्यावे
💥 मुंबईत कृती समितीच्या वतीने भव्य संमेलन घेऊन युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करावा
💥 या संमेलनात मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाची घोषणा करण्यात यावी.

प्रसंग गंभीर आहे आता अंगणवाडी कर्मचारी किती खंबीर आहेत हे या शासनाच्या लक्षात आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी एल्गार पुकारण्यासाठी सज्ज व्हावे.
एम ए पाटील ,शुभा शमीम ,दिलीप उटाणे कमल परुळेकर ,भगवानराव देशमुख
जीवन सुरुडे,जयश्री पाटील असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणेचे संघटक सचिव भानुदास पाटील यांनी कळविले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *