
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ
जळगाव :- सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष , प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक प्रा. जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी झाली असे विचार सत्यशोधक समाजाचे माझी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
वाघ यांनी पुढं आपल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले की , प्रा . उगले हे सत्यशोधक चळवळीचे नेते होते पण त्यापेक्षा ते या चळवळीचे एक संशोधक होते , त्यांनी अनेक ऐतिहासिक बाबी शोधून त्या पुस्तकरूपाने जन्मांसासमोर आणल्या. महात्मा फुले – मुक्त चिंतन , सत्यशोधक समाजाची अधिवेशने , सावित्रीबाई फुले अशी वीस पुस्तके त्यांनी लिहिली आहेत , ते सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुध्दा होते . या चळवळीत गेल्या तीस वर्षांपासून ते कार्यरत होते .
सत्यशोधक समाजास मरगळ आली असता ऍड. वसंतराव फाळके यांच्या नेतृत्वाखाली जी नव्याने ही चळवळ भरभराटीस आली त्यात उगले सरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे . त्यांनी सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन सुरू केले यातून अनेक सत्यशोधकी साहित्यिक महाराष्ट्रात उदयास आले , महात्मा फुले यांच्या दुर्लक्षित कार्याकडं महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले . सत्यशोधक समाज परिषद , सत्यशोधक समाज अधिवेशन , सत्यशोधक साहित्य संमेलन आदींचे आयोजन करणे करिता त्यांनी महाराष्ट्रात सारखे दौरे केले . महात्मा फुले यांच्या काळापासून वर्तमान काळातील सत्यशोधक कार्यकर्त्यांची माहिती संकलित करून पुस्तकरूपाने प्रसिध्द करण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले . कुऱ्हे पानाचे तालुका भुसावळ येथे संपन्न झालेल्या सत्यशोधक समाजाच्या शातकोत्तरी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते .अशी माहितीही जयसिंग वाघ यांनी पत्रकात नमूद केली आहे .