• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे

Sep 25, 2024

Loading

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे म्हणजेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे होय..
___________________________
महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत *13 फेब्रुवारी 2013* रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचा शासन निर्णय निर्गमित केला. शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील विविध संस्थांमधील कार्यरत शिक्षक तसेच भावी शिक्षक यांच्या पायाखालची वाळू सरकली. विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शासन निर्णयामुळे आनंद झाला. बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिकार 2009 अन्वये राज्यातील विविध संस्थांमध्ये शिक्षक पदी नेमणूक होणाऱ्या *पहीली ते आठवी* वर्गावरील सर्व शिक्षकांना सदर *शिक्षक पात्रता परीक्षा* उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले. सदर शासन निर्णय निर्गमित करण्यामागे शासनाचा पवित्र हेतू होता की, राज्यातील विविध संस्थांमध्ये नवनियुक्त होणारे तसेच कार्यरत असणारे शिक्षक ही परीक्षा पास होतील आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतील. विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षक व गुणवत्तापुर्ण ज्ञान मिळेल अशी आशा शासनाची होती.
विद्यार्थ्यांना भविष्यवेधी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन कितीही प्रशिक्षण व परीक्षांचे आयोजन करत असेल तरी राज्यातील काही भ्रष्टाचाराने बरबटलेले अधिकारी व भ्रष्टाचाराच्या वटवृक्षाच्या सावलीत जोपासलेले निर्धास्त मंडळी यांनी सदर पवित्र शासन निर्णयास काळे फसले. भरपूर शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या व संस्थाचालकांच्या मदतीने स्वतःची नियुक्ती *नववी व दहावी* वर्गावर कार्यरत दाखवून स्वतःला सदर शिक्षक पात्रता परीक्षेच्या कचाट्यातून वाचवून घेतले.
वारंवार परीक्षा देऊनही स्वतःची शिक्षक पात्रता सिद्ध होत नसल्याने काही मंडळींनी तर *तुकाराम सुपे* नावाच्या भ्रष्ट माणसाच्या मदतीने *दोन-दोन तीन-तीन लाखात* शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्रच विकत घेतले व आपली नोकरी अबाधित ठेवली. सदर शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा 2021 मध्ये उघडकीस आला. त्याची चर्चा जगभरात झाली. शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम ज्या लबाड लोकांनी केले त्यांच्याविरुद्ध शासन कठोर कारवाई करण्यास चार वर्षांपासून का दिरंगाई करत आहे. एवढेच नव्हे तर *प्राथमिक वर्गात नियुक्त असलेले प्राथमिक शिक्षक की जे सदर परीक्षा अपात्र आहेत त्यांनाही शासनाने शालार्थ देण्याचे पाप केलेले आहे.* जर *अपात्र लोकांना शालार्थ आयडी शासनाचे अधिकारी देत असतील तर मग ही परीक्षा का? व कोणासाठी घेण्यात येत आहे?* असा सवाल महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी,पालक व बेरोजगार शिक्षक पात्रता परीक्षा पात्र शिक्षकांना अहोरात्र भेडसावत आहे.
आता तर राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये *कंत्राटी पद्धतीने निवृत्त शिक्षक तसेच बेरोजगार डी.टी.एड व बी.एड. धारक,की जे शिक्षक पात्रता परीक्षा पास नाहीत अशा लोकांना दहा हजार मानधन तत्त्वावर नियुक्त केले जात आहे.* जर अशाच लोकांना शिक्षक पदी नियुक्त करायचे असेल तर मग का शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दरवर्षी शासनाने करावे? महत्वाचे म्हणजे बेरोजगार युवा वर्ग आधीच गरिबीने व मजबुरीने वैफल्यग्रस्त झालेला आहे. बऱ्याच तरुणांचे सर्व गुणवत्ता सिद्ध होऊनही नोकरी न मिळाल्याने लग्न सुद्धा होत नाहीत. त्यांची समाज एक प्रकारे चेष्टा व थट्टा करीत आहे. बरेच तरुण व्यसनी व निराश होऊन आत्महत्या करीत आहेत. अशा बेरोजगारीने पछाडलेल्या तरुणांकडून शासन परीक्षांच्या नावाने हजारो रुपये चलन गोळा करून कोट्यावधी रुपयांचा महसूल दरवर्षी शासन तिजोरीत जमा करीत आहे. तो जमा झालेला पैसा पगाराच्या माध्यमाने बोगस लोकांना वाटला जात आहे. असा उलटा कार्यक्रम शासन राबवित आहे. बेरोजगारीने अर्धमेलेल्या तरुणांकडून परीक्षेच्या नावाने असा भरमसाठ पैसा लुटणे म्हणजे *प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणेच होय.*
याविषयी सुज्ञ जाणकार लोकं शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. तरी झोपेचे सोंग घेणाऱ्या शासनाला आपल्या गाढ झोपेतून जाग येत नाही. *विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक एक गुरु समान असतात. व ते गुरु शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये घोटाळे करत असतील तर त्यांच्याकडून कसे बरं विद्यार्थी आदर्श घेऊ शकतात?* *_शिक्षक पात्रता परीक्षा पास होत नसल्याने स्वतःला नववी व दहावी वर नियुक्त करणा-या शिक्षकांकडून पालक व विद्यार्थी काय गुणवत्तेची अपेक्षा करू शकतात?_* असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे.
तरी शासनाला माझी विनंती आहे की, *ज्याप्रमाणे पहिली ते आठवीसाठी टीईटी परीक्षा आयोजित केली जाते त्याप्रमाणे नववी ते बारावीसाठी सुद्धा टीईटी परीक्षेचे बंधनकारक करुन अशा संधीसाधू लोकांचा खुश्कीच्या मार्ग बंद करावा.तरच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला काहीतरी महत्व व अर्थ उरणार.*
_____________________________
जय हिंद जय भारत..
लेखन:
*श्री ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर,*
*67, गणपती नगर हेडावे रोड, पैलाड, अमळनेर जि.जळगांव…*
M.A.B.Ed.English..
*(TET.5 वेळा पात्र)*
7020391684,9096928860.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed